भूमिपुत्रांच्या हक्कासाठी हौतात्म्य

By Admin | Updated: February 12, 2015 01:06 IST2015-02-12T01:06:49+5:302015-02-12T01:06:49+5:30

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त कृती समितीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

Martyrdom for the rights of the people of the land | भूमिपुत्रांच्या हक्कासाठी हौतात्म्य

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी हौतात्म्य

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त कृती समितीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडत असताना घणसोली गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ४५ वर्षांत भूमिपुत्रांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून शासन, सिडको व महापालिका प्रशासन अजून किती प्रकल्पग्रस्तांचे बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाने नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी १९७० मध्ये ठाणे, उरण व पनवेल तालुक्यामधील जमीन संपादन केली. शहर वसविण्यासाठी सिडकोची स्थापना करण्यात आली. यानंतर नवी मुंबई महापालिकेचीही स्थापना झाली. परंतु मागील ४५ वर्षांत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रकल्पग्रस्त संघटना सातत्याने प्रश्न सोडविण्यासाठी लढा देत आहेत. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त कृती समितीने बुधवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये घणसोली गावातील गोपीनाथ म्हात्रेही सहभागी झाले होते. आंदोलकांना मार्गदर्शन करताना त्यांनी ४५ वर्षांतील आंदोलनांची माहिती दिली. कोणी कशी आश्वासने दिली व कोणी कसे फसविले याचे पुरावे त्यांनी भाषणातून दिले. हक्कासाठी तीव्र लढा दिला पाहिजे. कार्यालयांमध्ये घुसून प्रशासनास जाब विचारला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. भाषण सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तत्काळ एमजीएम रुग्णालयामध्ये नेले परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. चळवळीतील कार्यकर्त्याने लढा देतानाच हौतात्म्य पत्करले. त्यांच्या निधनाने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. आता तरी महापालिका, सिडको व शासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
महापालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी व इतर कर्मचारी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण मिळावे. गरजेपोटी बांधलेल्या घरांना तिप्पट दराने आकारण्यात येणारा मालमत्ता कर कमी करावा. फेरीवाला धोरणांतर्गत परवाने वाटताना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे. प्रकल्पग्रस्त महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. प्रकल्पग्रस्तांना लग्न व इतर सांस्कृतिक कार्यासाठी अल्प दरात समाजमंदिर उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी कृती समितीकडून देण्यात आला. आंदोलनामध्ये डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, वसंत म्हात्रे, जयराम म्हात्रे, महादेव मढवी, नारायण पाटील, दिगंबर पाटील उपस्थित होते. आंदोलकांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना मागण्यांचे निवेदन दिले. आयुक्तांनी व महापौर सागर नाईक यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Martyrdom for the rights of the people of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.