प्रेमविवाहाच्या अपेक्षाभंगाने विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: January 28, 2015 00:47 IST2015-01-28T00:47:38+5:302015-01-28T00:47:38+5:30
पती-पत्नीमधील वादातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. त्यांचा प्रेमविवाह झालेला

प्रेमविवाहाच्या अपेक्षाभंगाने विवाहितेची आत्महत्या
नवी मुंबई : पती-पत्नीमधील वादातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. त्यांचा प्रेमविवाह झालेला असून, पतीला व्यसन असल्याने त्यांच्यात वाद व्हायचा. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १ येथे सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. तेथे राहणाऱ्या सोनल दंदे (२४) हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिचा अमित दंदे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता.
पतीने व्यसन सोडावे यासाठी सोनल ही सतत प्रयत्न करत होती. मात्र अमित तिच्याकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्यात भांडण व्हायचे. लग्नापूर्वी हे दोघेही कोपरखैरणेमध्येच रहायला होते. यादरम्यान त्यांच्यात परिचय होऊन प्रेमसंबंध झाले. लग्नानंतर अमितचे व्यसन सुटेल अशी सोनलला अपेक्षा होती. मात्र लग्नानंतरही अमितच्या वागण्यात बदल झालेला नव्हता. सोमवारी रात्री हे दोघेही गावी जाणार होते. परंतु अमितने सोनलला सोबत नेणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर जेवण करून काही वेळासाठी अमित झोपला असता सोनलने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये आपला अपेक्षाभंग झाल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. त्यानुसार अमित याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)