२५ हजारांच्या हुंड्यासाठी केला विवाहितेचा छळ
By Admin | Updated: February 15, 2015 23:04 IST2015-02-15T23:04:34+5:302015-02-15T23:04:34+5:30
माहेरहून २५ हजारांचा हुंडा आणण्यासाठी पती रोहित रोकडेसह सासरच्या मंडळींनी सीमा या विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार किसननगर भागात घडला

२५ हजारांच्या हुंड्यासाठी केला विवाहितेचा छळ
ठाणे : माहेरहून २५ हजारांचा हुंडा आणण्यासाठी पती रोहित रोकडेसह सासरच्या मंडळींनी सीमा या विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार किसननगर भागात घडला. याप्रकरणी तिने श्रीनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
सीमाचा २ जून २०१३ रोजी रोहितशी विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच किसननगरच्या तिच्या सासरी पती तसेच बबन (सासरे), करुणा (सासू), सचिन (दीर), रेखा काळे, चित्रा खरात आणि कल्पना लोखंडे (तिन्ही मावस सासू) या सर्वांनी मिळून लग्नातील हुंडा म्हणून २५ हजारांची रोकड आणण्यासाठी तिला शिवीगाळ करून मानसिक, शारीरिक छळ केला.
माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हुंड्याची रक्कम आणू न शकल्यामुळे तिला या सर्वांनी मारहाण केली. नंतर, ‘तुला सासरी नांदायचे नाहीतर आयुष्यातून उठवू’, अशी धमकी दिली.
शिवाय, माहेरहून मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या स्त्रीधनाचाही त्यांनी अपहार केला. हा सर्व प्रकार २८ जानेवारी २०१५ पर्यंत सुरू होता. अखेर, याप्रकरणी तिने १३ फेब्रुवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)