Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; रिमझिम पावसातही मुंबईकरांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:51 IST

चायना लायटिंगची १०० ते १ हजार रुपयांपर्यंत विक्री सुरू आहे. यंदा बाजारात १२ स्टार तोरण आणि फुलांचे तोरण ही नवीन तोरणे उपलब्ध आहेत

मुंबई : दिवाळीमध्ये घरांची सजावट, रांगोळी, फटाके, मिठाई, कपडे इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी शनिवारी ग्राहकांची मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती. रविवारी अभ्यंग स्नान असल्याने फुले व अन्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे दादर फूल मार्केटसह अन्य सर्वच मार्केट ग्राहकांनी फुलले होते. रिमझिम पावसातही मुंबईकरांचा खरेदीची उत्साह कायम होता. दादर, कुर्ला, लालबाग, मशीद बंदर येथे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे.

तोरण विकणारे नवरंग दुकानाचे मालक तौफिक शेख म्हणाले की, तोरणामध्ये जास्त इंडियन माल मिळत नाही. सर्व माल हा चायना असतो. चायना लायटिंगची १०० ते १ हजार रुपयांपर्यंत विक्री सुरू आहे. यंदा बाजारात १२ स्टार तोरण आणि फुलांचे तोरण ही नवीन तोरणे उपलब्ध आहेत. तसेच फेरी लाइट हीदेखील ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा ७५ टक्के मार्केट डाऊन आहे.अक्षय बॅगचे मालक अरुण दरेकर म्हणाले की, घराची सजावट करण्यासाठी आकर्षक कापडी पडदे, साडी कव्हर, टीव्ही कव्हर इत्यादी वस्तूंना ग्राहकांकडून मागणी आहे. परंतु सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धंद्यावर परिणाम होत आहे. पाऊस सुरू झाल्यावर ग्राहकांची गर्दी कमी होते. व्यवसायाला निवडणुकांचाही फटका बसला आहे. त्यामुळेच गेल्या दिवाळीपेक्षा यंदा कमी व्यवसाय झाल्याचे त्यांनी सांगितले.

पणती व रांगोळी विक्रेते नीलेश मोरे यांनी सांगितले की, रांगोळी दहा रुपये पॅकेटप्रमाणे विकली जात आहे. तसेच पाच ते दहा रुपयांपर्यंत पणतीचा भाव आहे. पावसामुळे पणतीचे भाव उतरले आहेत. रांगोळी व पणतीचा १० टक्के भाव कमी झाला आहे.प्लॅस्टिक कंदिलांना पसंतीमुंबईत अजूनही पावसाने परतीचा मार्ग धरलेला नाही. दिवाळीतही पाऊस सुरूच आहे. पावसात कंदील भिजतात, त्यामुळे यंदा प्लॅस्टिक कंदिलांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. प्लॅस्टिक कंदिलांमध्ये ३डी कंदीलला जास्त पसंती दिली जात असल्याचे विक्रेते नीलेश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :दिवाळी