मार्केटिंग मॅनेजमेंट, बॉलीवूडकरांचा फंडा!
By Admin | Updated: February 15, 2015 01:09 IST2015-02-15T01:09:49+5:302015-02-15T01:09:49+5:30
दोन दशकापूर्वी प्रदर्शित होणारे बॉलीवूडचे सिनेमे आणि आताचे सिनेमे दर्जात्मक पातळीवर प्रेक्षकांच्या अभिरूचीला कायमच उतरत असले तरी, यात कालौघात एक फरक झाला आहे.

मार्केटिंग मॅनेजमेंट, बॉलीवूडकरांचा फंडा!
मनोज गडनीस - मुंबई
दोन दशकापूर्वी प्रदर्शित होणारे बॉलीवूडचे सिनेमे आणि आताचे सिनेमे दर्जात्मक पातळीवर प्रेक्षकांच्या अभिरूचीला कायमच उतरत असले तरी, यात कालौघात एक फरक झाला आहे. तो आहे बॉक्स आॅफिसच्या कलेक्शनचा ! पूर्वीच्या सिनेमांप्रमाणे आताचे सिनेमेही लोकप्रियेतेचे नवे विक्रम गाठत असतानाच, त्याचसोबत कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासही विसरत नाहीत. १५ ते २० वर्षांपूर्वी सिनेमा कितीही लोकप्रिय झाला तरी ५० कोटी रुपयांचा गल्ला म्हणजे डोक्यावरून पाणी मानले जाई. पण आता हाच सिनेमा १०० आणि २०० कोटी रुपयांचा गल्ला अगदी सहज जमवतोय. असे का होत असेल, असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचे एक वाक्यातले उत्तर आहे, आजच्या सिनेमाला झालेला मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या तंत्राचा परिसस्पर्श ! विशेष म्हणजे, सिनेमाचे मार्केटिंग आणि ब्रँडिग हा केवळ ह्यएजन्सीह्णच्या ह्यव्यवसायाचाह्णचा भाग राहिलेला नसून, या मॉडेलचा अभ्यास आयआयएमसारख्या दिग्गज शैक्षणिक संस्थेने करून यातील करियर संधींचा वेध घेतला आहे.
‘भाग मिल्खा भाग’ या व अशा काही प्रतिथयश सिनेमांचे असेच मार्केटिंग आणि ब्रँडिंग करणाऱ्या ‘स्पाईसह्ण नावाच्या कंपनीच्या या बॉलीवूड मॉडेलचा अभ्यास आयआयएम बंगलोरच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. केवळ अभ्यास अथवा शैक्षणिक प्रकल्प एवढीच याची व्याप्ती नसून या अभ्यासातून रंजक व उद्बोधक माहिती पुढे आली आहे. सिनेमातील मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या तंत्राची उकल करताना, आयआयएम बंगलोरच्या कॉर्पोरेट स्ट्रटेजी विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. रघुनाथ यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत सध्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची संख्या अधिक आहे. बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड, प्रादेशिक भाषांतील सिनेमे असे एकाच वेळी प्रदर्शित होत असतात. अशावेळी प्रेक्षकांना आकृष्ट करण्यासाठी प्रसिद्धीच्या परंपरागत साधनांना जर मार्केटिंग आणि ब्रँडिंगची जोड दिली तर अधिक परिणामकारकता साधता येते, हे जाणवत होते. याच अनुषंगाने आम्ही अभ्यास सुरू केला. या अभ्यासाद्वारे अनेक मुद्यांची उकल झाली. प्रा. रघुनाथ पुढे म्हणाले, एखाद्या सिनेमाचे मार्केटिंग व ब्रँडिंग करताना त्याला परिपूर्ण कॅम्पेन म्हणून डिझाईन करावे लागते. यामध्ये, त्या सिनेमच्या विषयाची वस्तुनिष्ठता, भारतीय समाजातील वेगवेगळे वर्ग व त्या दृष्टीने सिनेमाचे बदलते थीम कॅम्पेन, प्रेक्षकांच्या मानसिकतेचा व अभिरूचीचा सखोल अभ्यास अशा विविध मुद्यांचा सखोल अभ्यास करून या अनुषंगाने कॅम्पेन डिझाईन करावे लागते. स्पाईस कंपनीचे मुख्याधिकारी प्रभात चौधरी म्हणाले की, आयआयएमसारख्या संस्थेने सिनेमाच्या मार्केटिंगचा आणि ब्रँडिंगचा अभ्यास सुरू करणे ही महत्वपूर्ण बाब आहे. कारण, यामुळे याचा शास्त्रीय अभ्यास होतानाच नवीन कौशल्ये याद्वारे विकसित होतील. डिझाईन केलेल्या कॅम्पेनला प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर, त्यांच्यातील आपआपसात समन्वय यांचाही विचार करावा लागतो.
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग याला खूप महत्व आहे. जसे, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासून त्यातील विविध कंगोऱ्यांना नेमकेपणाने टिपून त्याद्वारे आकर्षक प्रोमो, लोकांना सहभागी करून घेता येतील अशा स्पर्धा, वर्तमानपत्रांद्वारे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतानाच, त्यांना सिनेमापर्यंत घेऊन येईल अशा पद्धतीची काही वेगळी बातमी, अभिनेत्यांनी स्वत: केलेले टिष्ट्वट, किंवा सोशल मीडियाचा प्रभावी वापर अशा अनेक गोष्टींचा खुबीने वापर करावा लागतो.
केवळ बॉलीवूडच नव्हे तर आता प्रादेशिक सिनेमा उद्योगांनाही मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे महत्व लक्षात येऊ लागले आहे. विशेषत: मराठी सिनेमाबद्दल सांगायचे तर, आता मराठी उद्योगांनीही केवळ सिनेमा प्रदर्शित करणे व त्याचे परिक्षण प्रसिद्ध होण्याचे तंत्र वापरणे, यापलीकडे जात मार्केटिंगचे महत्व जाणले आहे. यामध्ये मग, मराठी सिनेमामध्ये उत्तम स्टारकास्ट, त्यांच्या अनुषंगाने पूर्वप्रसिद्धी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर तसेच एफएमवरून स्टारकास्टच्या मुलाखती किंवा त्या माध्यमातून प्रचारावर भर दिला आहे.
मुख्य म्हणजे, ब्रँडिंग किंवा सिनेमाचा दर्जा सुधारतानाच मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी तर काही मराठी सिनेमांची केवळ सिनेमाच्या आणि त्याच्या संकल्पनेच्या ब्रँडिंगवर लक्ष दिले नाही तर वीस कोटी क्लब अर्थात किमान कलेक्शन २० कोटी रुपये असे लक्ष्य निर्धारित केले आणि याकरिता आवश्यक असे मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी वेगळे घसघशीत बजेटही निश्चित करून त्यादृष्टीने खर्च केला.