Join us  

बाजारातील तेजी कायम; सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 1:27 AM

सकाळी बाजार तेजीमध्येच खुला झाला.

मुंबई : जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा लाभ भारतीय शेअर बाजाराला मिळाला आहे. यामुळे तसेच परकीय वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे शेअर बाजरामधील तेजी कायम राहिली असून, सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी नवीन उंची गाठली  आहे. 

सकाळी बाजार तेजीमध्येच खुला झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक दिवसअखेर ३८०.२१ अंश म्हणजे ०.८१ टक्क्यांनी वाढून ४७,३५३.७५ अंशांवर बंद झाला. सोमवारच्या व्यवहारांदरम्यान सेन्सेक्सने ४७,४०७.७२ अंश ही आतापर्यंतची उच्चांकी धडक दिली आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२३.९५ अंशांनी म्हणजे ०.९० टक्क्यांनी वाढून १३,८७३.२० अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने १३,८८५.३० अंशांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.  बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार असल्यामुळे बाजारात तेजी दिसून आली.

आशियामधील शेअर बाजारांसह युरोपमधील शेअर बाजार हे तेजीमध्ये असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण राहिले. अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज आणि ब्रेक्झिटनंतर इंग्लंडने केलेला व्यापार करार या घटनांमुळे बाजारात तेजी दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजार