मार्ड करणार एड्सविषयी जनजागृती
By Admin | Updated: November 30, 2015 02:31 IST2015-11-30T02:31:51+5:302015-11-30T02:31:51+5:30
लग्न ठरवताना मुला-मुलीची पत्रिका पाहिली जाते. पत्रिका जमल्यावर पुढच्या गोष्टी ठरवण्यात येतात. पण, पत्रिकेपेक्षा आधी मुला-मुलीने एचआयव्ही-एड्सची तपासणी करून घ्यावी,

मार्ड करणार एड्सविषयी जनजागृती
मुंबई : लग्न ठरवताना मुला-मुलीची पत्रिका पाहिली जाते. पत्रिका जमल्यावर पुढच्या गोष्टी ठरवण्यात येतात. पण, पत्रिकेपेक्षा आधी मुला-मुलीने एचआयव्ही-एड्सची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला निवासी डॉक्टर रुग्णांना देऊन १ डिसेंबरपासून सात दिवस एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करणार आहेत.
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशात १७ ते २५ वयोगटातील एड्सग्रस्तांची संख्या जास्त आहे. तरुणांना एड्सची बाधा होणे चांगले लक्षण नाही. त्यामुळे जनजागृती सप्ताहात रुग्णालयात येणाऱ्या १५ ते २५ वयोगटातील रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या वयोगटातील रुग्णांना ‘सेक्स एज्युकेशन’ देण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने प्रजनानाविषयी माहिती देण्यात येणार आहे. या वयोगटातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. ज्या मुलाशी अथवा मुलीशी लग्न करणार आहोत, त्याच्या आरोग्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
त्यामुळे दोघांनीही एचआयव्ही एड्सची तपासणी पत्रिका पाहण्याआधी करून घ्या अशी जनजागृती करणार असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
एचआयव्ही एड्सविषयी असलेले वेगवेगळे गैरसमज या वेळी दूर करण्यात येणार आहेत. एचआयव्हीची लागण ही अनैतिक संबंध, आईकडून बाळाला आणि रक्त संक्रमणातून होते. याच तीन मार्गाने संसर्ग होऊ शकतो, हेदेखील रुग्णांना समजावून सांगण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एचआयव्ही एड्सच्या उपचारांसदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखलेली आहेत. अनेक डॉक्टर अजूनही आधीची उपचार पद्धती वापरत आहेत. डॉक्टरांना नव्या
उपचार पद्धतीची माहिती देण्यात येणार आहे.
एचआयव्ही एड्सची लागण झाल्यावर नियमितपणे औषधे घेणे आवश्यक आहे. औषध घेणे सोडून दिल्यानंतर एचआयव्हीचा संसर्ग बळावतो. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी औषधे मध्येच सोडू नये याविषयी एड्सग्रस्तांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व निवासी डॉक्टर सात दिवस लाल रिबीन लावून काम करणार असल्याचेही डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)