मराठमोठ्या आदरातिथ्याची भुरळ
By Admin | Updated: May 6, 2015 23:17 IST2015-05-06T23:17:01+5:302015-05-06T23:17:01+5:30
‘जिवा शिवाची बैल जोड’ हे गाणे मराठमोठ्या रसिकांच्या ओठी आजही अनेकदा ऐकायला मिळते. कामोठकर खवय्ये सध्या हेच गाणे गुणगुणत आहेत.

मराठमोठ्या आदरातिथ्याची भुरळ
कळंबोली : ‘जिवा शिवाची बैल जोड’ हे गाणे मराठमोठ्या रसिकांच्या ओठी आजही अनेकदा ऐकायला मिळते. कामोठकर खवय्ये सध्या हेच गाणे गुणगुणत आहेत. येथील एका हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खिल्लारी बैलजोडीची हुबेहूब प्रतिकृती उपहारगृहासमोर स्वागतासाठी सज्ज केली आहे.
शहरातील मुलांसाठी शेती, गाई-बैल, मातीची भांडी आदींचे नेहमीच आकर्षण असते. कळंबोली, पनवेल परिसरात सर्वधर्मीय रहिवाशी राहत असले तरी, कामोठे वसाहतीत तुलनेने महाराष्ट्रीय लोकवस्ती जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी येथील एका हॉटेल व्यावसायिकाने प्रवेशद्वारावर बैलजोडी ठेवण्याची अनोखी युक्ती केली आहे.
ही बैलजोडी फायबरची असली तरी उपहारगृहात स्वागतासाठी खरे बैल उभे असल्याचा आभास होत असल्याचे याठिकाणी आलेल्या संजय मोरे या ग्राहकाने सांगितले. खिल्लारी बैलांसारखे शिंग, वशिंग, बोलके डोळे, शेपटी, नाकात वेसण, मोरख्या, गळ्यात घुंगरमाळ, शिंगांत गुलाबी गोंडे असा साज या बैलांना चढविण्यात आला आहे. उपहारगृहाच्या समोर बैलांची ही प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. बैलजोडीच्या प्रतिकृतीबरोबरच उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांचे स्वागत करण्याकरिता मराठमोळ्या पद्धतीने तुतारीवादकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे येथील व्यवस्थापक संजय राठोड यांनी सांगितले. (वार्ताहर)