Join us  

गुगलकडून 'मराठमोळ्या बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे कार्याला सलाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 10:09 AM

कुष्ठरोग्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या बाबा आमटेंची आज 104 वी जयंती आहे.

मुंबई - इंटरनेट विश्वातील मायाजाल असलेल्या गुगलने मराठमोळ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांना डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. मुरलीधर देवदास आमटे म्हणजेच बाबा आमटेंच्या कार्याला डुडलद्वारे अभिवादन करण्यात आलं आहे. आज बाबा आमटेंची 104 वी जयंती आहे. त्यानिमत्ताने जगविख्यात गुगलने मराठी माणसाच्या अमर्यादीत कार्याला मानवंदना दिली. 

कुष्ठरोग्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या बाबा आमटेंची आज 104 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने बाबा आमटेंच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गुगलने ही पाच छायाचित्रांचा एक स्लाईड शो बनविला आहे. त्याद्वारे बाबांच्या समाजकार्याची महती जगाला दाखवून गुगलने बाबा आमटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 26 डिसेंबर 1914 साली विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बाबा आमटेंचा जन्म झाला होता. मुरलीधर देवदास आमटे नावाने परिचित असलेले आमटे आपल्या समाजकार्यामुळे आणि कुष्ठरोग्यांच्या सेवाव्रतामुळे जगाचे बाबा आमटे बनले. सन 1985 साली बाबांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो आंदोलन केले होते. देशात एकात्मतेचा संदेश देणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाबांनी हे आंदोलन केले होते. दरम्यान, बाबा आमटेंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना युनाइटेड नेशन्सचाही अवॉर्ड प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यातून जगाला प्रेरणा देणाऱ्या बाबा आमटेंनी 9 फेब्रुवारी 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला. 

 

टॅग्स :गुगलडूडल