मराठी टक्क्यामुळे मिळाला विजय
By Admin | Updated: October 23, 2014 02:24 IST2014-10-23T02:24:53+5:302014-10-23T02:24:53+5:30
जोगेश्वरीत मराठी टक्का मोठा आहे़ येथील मराठी माणसाला शिवसेनेने भावनिक पातळीवर बांधून ठेवले आहे़

मराठी टक्क्यामुळे मिळाला विजय
शेफाली परब-पंडित, मुंबई
मुंबई : जोगेश्वरीत मराठी टक्का मोठा आहे़ येथील मराठी माणसाला शिवसेनेने भावनिक पातळीवर बांधून ठेवले आहे़ त्यामुळे पूर्वी तीन वेळा नगरसेवक व आमदारपदाच्या एका टर्ममुळे रवींद्र वायकर या मतदारसंघासाठी परिचयाचे आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही जागा एकहातीच मानली जात होती़ त्यात एका पक्षानेही दमदार उमेदवार या मतदारसंघात न दिल्याने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले़
प्राचीन गुंफा, आदिवासी पाडा आणि बेहराम बागमुळे हा मतदारसंघ संवेदनशीलच मानला जातो़ रवींद्र वायकर गेली १५ वर्षे नगरसेवक म्हणून जोगेश्वरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत़ त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री देण्यात येत होती़ मात्र या मतदारसंघात संघाचाही प्रभाव असल्याने भाजपाने पालिकेतील सुधार समितीच्या अध्यक्ष उज्ज्वला मोडक यांना उमेदवारी दिली़ मनसेने नगरसेवक भालचंद्र आंबुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले़ मोडक यांनी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता़ परंतु मराठी मतांचा गठ्ठा उघडताच वायकर १४ व्या फेरीनंतर आघाडी घेत २९ हजार मतांनी विजयी झाले.