मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी विरोधकांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसोबतच इतर छोटे पक्षही या निवडणुकीची तयारी करत आहेत. यात मुंबईतील उत्तर भारतीयांचा टक्का पाहता उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी शहरातील सर्व उत्तर भारतीयांना एकत्रित येण्याचं आवाहन करत महापौरपदी उत्तर भारतीय बनू शकतो असं विधान केले आहे.
सुनील शुक्ला यांनी म्हटलं की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत उत्तर भारतीयांची सत्ता असू शकते, ज्याचे बजेट ५५ हजार कोटी इतके आहे. इथे महापौर उत्तर भारतीय बनू शकतो हा मला विश्वास आहे. संपूर्ण मुंबईची लोकसंख्या २ कोटी १० लाख आहे. त्यात १ कोटी उत्तर भारतीय, १ कोटी मराठी आणि इतर राज्यातील लोक २० लाख आहेत. मराठी माणूस हा ५ पक्षात विखुरला गेला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपा आणि काँग्रेसला मतदान करेल. परंतु उत्तर भारतीय इथं वंचित आहे, पीडित आहे. उत्तर भारतीयांना मारले जाते त्यामुळे ही वेळ आहे एकत्र यायला हवे असं आवाहन त्यांनी केले.
त्याशिवाय उत्तर भारतीय विकास सेना हा पर्याय म्हणून तुमच्यासमोर आला आहे. जर आम्ही उत्तर भारतीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो आणि तुम्ही त्याला मतदान केले. १० टक्क्यांपैकी फक्त ३ टक्के लोकांनी मतदान केले तरीही मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवू शकतो. मराठी माणसाने ५ पक्षांना मतदान केले, त्या ५ पक्षांनी २० टक्के मतदान घेतले तरी ते वर येऊ शकत नाहीत. त्यामुळे उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते. जर तुम्ही आता एकत्र आला नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला इथून हाकलून दिले जाईल असंही सुनील शुक्ला यांनी सांगितले.
दरम्यान, ही निवडणूक अखेरचा पर्याय आहे. जर तुम्हाला मुंबईत टिकून राहायचे असेल, तुमचं आणि तुमच्या मुलांचे भविष्य सुनिश्चित करायचे असेल त्यांना सुरक्षा द्यायची असेल. तर तुम्हाला एकत्र यावे लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेत तुमचे स्वागत आहे. मी कुठलीही निवडणूक लढणार नाही परंतु प्रत्येक निवडणुकीत उत्तर भारतीय उमेदवाराला लढवेन. २२७ जागांवर उत्तर भारतीय विकास सेनेचा उमेदवार उभा केला जाईल. आपण ही निवडणूक जिंकू आणि मुंबईचा महापौरही आपला असेल. हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. फक्त तुम्हाला मतदान करायचे आहे असंही सुनील शुक्ला यांनी म्हटलं.