Join us  

Marathi: शाळांच्या पाट्याही आता मराठीत, पालिका शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 9:34 AM

Marathi: मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पाट्यानंतर आता मुंबई शहरातील शाळांचे नामफलकही मराठीतच दिसणार आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पाट्यानंतर आता मुंबई शहरातील शाळांचे नामफलकही मराठीतच दिसणार आहेत. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून सर्व भाषिक अनुदानित, विनाअनुदानित, तसेच विविध मंडळांच्या शाळांचे नामफलक हे मराठी भाषेत लावण्यात यावेत, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयांपाठोपाठ आता शाळांच्या पाट्याही मराठीत दिसणार आहेत. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच त्याला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ या सुधारित नियमानुसार दुकाने, आस्थापना, शाळा व महाविद्यालयाचे नामफलक प्रथमदर्शनी मराठी भाषेत लावण्याचे अनिवार्य केले. ही अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी शिक्षण विभागामार्फत तसे पत्रक काढण्याची मागणी युवासेनेने २४ मार्च रोजी केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांनी पालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे निर्देश दिले. याबाबतीत योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी मुंबई महापालिका शिक्षण समिती सदस्य आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, युवासेना सहसचिव ॲड. संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांनी शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या निर्णयामुळे आता मुंबईतील अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि अन्य खासगी बोर्डाच्या २१९ शाळांचे नामफलक मराठीत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्याखाली अन्य शैक्षणिक मंडळाशी संलग्न शाळांनाही सूचना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महापालिका शाळा मंजुरी क्रमांकासह ८ बाय ३ आकाराचा फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही पालिकेकडून देण्यात आले आहेत.

टॅग्स :शाळामराठी