मराठी माणूस तिथे लोकमत

By Admin | Updated: October 7, 2014 23:11 IST2014-10-07T23:11:17+5:302014-10-07T23:11:17+5:30

लोकमत हे अतिशय लोकप्रिय वृत्तपत्र असून मांडणीही अतिशय उत्कृष्ट असते. अंक हातात घेतल्यानंतर तो पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावासा वाटत नाही

Marathi people there Lokmat | मराठी माणूस तिथे लोकमत

मराठी माणूस तिथे लोकमत

प्रशांत शेडगे, पनवेल
लोकमत हे अतिशय लोकप्रिय वृत्तपत्र असून मांडणीही अतिशय उत्कृष्ट असते. अंक हातात घेतल्यानंतर तो पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावासा वाटत नाही. जिथे मराठी माणूस तिथे लोकमत असे समीकरणच झाले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ निरुपणकार दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लोकमत वृत्तसमूहाचे कौतुक केले.
पनवेल येथील विभागीय कार्यालयाचे सोमवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, प्रकाशभाऊ धर्माधिकारी, दिग्दर्शक -अभिनेता सतीश राजवाडे, लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला आणि व्यवस्थापक विजय झिमुर उपस्थित होते.
आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ वर्तमान असून वर्तमानाची क्रिया प्रत्येकाला अंत:करणात जपायला पाहिजे, असे मत आप्पासाहेबांनी व्यक्त केले. देशाचे भवितव्य घडवायचे असल्यास एकात्मता आवश्यक असून संवाद हा प्रत्येकाच्या अंत:करणाची भावना जाणून घेतो, त्याकरिता अंत:करण जागृत असणे गरजेचे असल्याचे मतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. चांगल्या विचारांची भूमिका माणसाला चांगले बनवते त्यासाठी चांगले संस्कार आवश्यक असल्याचा सल्लाही आप्पासाहेबांनी उपस्थितांना दिला. लोकमतने अतिशय चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्यामुळेच सचिन पिळगावकर यांच्यासारख्या महान कलाकाराची भेट झाल्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी आवर्जून केला. सध्या अनेक वर्तमानपत्रे प्रसिध्द होतात मात्र लोकमतचे नाव पाहिल्यावरच वाचनाची उत्सुकता वाढत असल्याचे सचिन पिळगावकर यांनी सांगितले. लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ही एक विचारधारा असल्याचे सचिन यांनी सांगितले. यावेळी लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आणि सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी आगामी काळात पनवेल परिसराचा विकास करण्यास लोकमतची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी पनवेल पालिकेचे बांधकाम सभापती राजू सोनी, सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ सुहास हळदीपूरकर, डॉ. प्रज्ञा भोईर, मदार काने, रसिक आंगे यांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानित केले.

Web Title: Marathi people there Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.