मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यालयासाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2023 18:35 IST2023-10-15T18:35:42+5:302023-10-15T18:35:49+5:30
स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दखल घेत तातडीने आंदोलनाला भेट दिली.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यालयासाठी धरणे आंदोलन
जनसामान्यांचे प्रश्न निस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे वर्तमानपत्रातून लिहिणाऱ्या वृत्तपत्र लेखकाची मातृसंस्था असलेल्या 'मराठी वृत्तपत्र लेखक संघा'ने शिंदेवाडी येथील पालिका शाळेतील कार्यालयासाठी रविवारी जोरदार धरणे आंदोलन केले. त्याची स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दखल घेत तातडीने आंदोलनाला भेट दिली. संबंधितांशी संपर्क साधून कार्यालय पुन्हा मिळवून देतो, असे आश्वासन कोळंबकर यांनी वृत्तपत्रलेखकांना दिले.
अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन सिल केले आहे. त्यामुळे संस्था गेल्या चार वर्षांपासून कार्यालयाशिवाय कारभार चालवित आहे. २०१६पासून पालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी, पत्रव्यवहार करूनही आश्वासनापलीकडे कुणीही दाद घेत नव्हते. त्याविरोधात दाद मागण्यासाठी मुंबई-ठाण्यातील वृत्तपत्र लेखकांनी अखेर जुने कार्यालय असलेल्या शिंदेवाडी महापालिका शाळेसमोर एकत्र येत रविवारी आंदोलन केले.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर यांनी या धरणे-आंदोलनाला तातडीने भेट दिली. तसेच येथील आंदोलनकर्त्या वृत्तपत्रलेखकांसमोर संबंधित पालिका अधिकारी तसेच इतरांशी संपर्क साधून तातडीने हे कार्यालय पुन्हा मिळवून देतो असे अश्वासन कोळंबकर यांनी अध्यक्ष मालुसरे यांना दिले.
यावेळी वृत्तपत्रलेखक संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्यवाह नितीन कदम, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड आणि संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, मनोहर साळवी, कृष्णा काजरोळकर, मनमोहन चोणकर, कृष्णा ब्रीद, प्रकाश बाडकर, सूर्यकांत भोसले, दिलीप ल सावंत, गुरुनाथ तिरपणकर, दिगंबर चव्हाण, विवेक तवटे, राजन देसाई,अब्बास अत्तार, चंदन तावडे, रामचंद्र जायसवाल, दिलीप दळवी, दादा येंधे,अर्जुन जाधव, प्रशांत भाटकर आदी वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.
वृत्तपत्र लेखक चळवळीवर अन्याय
जनसामान्यांचे प्रश्न निस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे वर्तमानपत्रातून लिहिणारी महाराष्ट्रातील ही महत्वाची वृत्तपत्र लेखक चळवळ शिंदेवाडी पालिका शाळेत कित्येक वर्ष सुरु आहे. हे कार्यालय म्हणणे एकप्रकारे वृत्तपत्र लेखक चळवळीचे केंद्र आहे. कार्यालय सुरु राहण्यासाठी तातडीने मुंबई मनपा अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. तरी सुद्धा कार्यालय बंद करण्यास भाग पाडणे हा चळवळीचा अन्याय आहे.