Join us  

मनसेच्या तंबीनंतर ‘देवा’ला मिळणार राज्यभरात 225 स्क्रीन !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 6:41 PM

‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये देवा चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता.

मुंबई : ‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये देवा चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर आज थिएटर मालकांनी ‘देवा’ लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्यापासून राज्यभरातील 225 स्क्रीनवर ‘देवा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 22 डिसेंबर रोजी यशराज फिल्म्सचा अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला ‘टायगर जिंदा है’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी ‘देवा’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. मात्र, ‘देवा’ला प्रदर्शनासाठी स्क्रीन्स उपलब्ध होत नसल्याने वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांची बाजू स्पष्ट केली. ‘देवा’ देखील धुमधडाक्यात प्रदर्शित करण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे; परंतु यदाकदाचित तसे झाले नाही, तर यशराज फिल्म्सच्या शूटिंग महाराष्ट्रात होत असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन थिएटर्सनीही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. तर, ‘देवा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरीने, ‘आम्हाला वाद नकोत; ‘टायगर जिंदा है’ चित्रपट पण चालू दे आणि माझा ‘देवा’ पण चालू दे एवढीच आमची इच्छा आहे,’ अशी भूमिका या एकूणच प्रकरणावर मांडली आहे. दरम्यान, ‘देवा’ चित्रपटाला आता 225 स्क्रीन मिळाल्या असल्या तरी फारच कमी ठिकाणी प्राईम टाईम मिळाला आहे. त्यामुळे आता मनसे प्राईम टाईमचा विषय लावून धरणार की, माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेची दादागिरी खपवून घेणार नाही -  नाईकआमचा कुठल्याही मराठी चित्रपटाला विरोध नाही किंवा कुठल्या हि एका हिंदी चित्रपटाला पाठिंबा नाही, परंतु ‘‘जर मराठी चित्रपटाला स्क्रीनस मिळाल्या नाही तर आम्ही सिनेमागृह फोडून टाकू, अशा ह्या मनसेच्या दादागिरीला आम्ही खपवून घेणार नाही. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे नेहेमी प्रमाणे प्रक्षोभक विधाने करीत आहेत आणि आमचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम याना डीवचण्याची भाषा करीत आहेत. मी एक काँग्रेस कार्यकर्ता आणि मुंबई काँग्रेस चित्रपट व टीव्ही संघटनेचा सरचिटणीस म्हणून मनसेला आवाहन करतो की मनसेने वेळ आणि जागा ठरवा, आम्ही तेथे येऊ आणि जशास तसे उत्तर देऊ. वेळ आल्यास कोण कोणाला दणका देतो ते कळेलच. या प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबादारी भाजपा सरकार, प्रशासनाची आणि पोलिसांची राहील, असे मुंबई काँग्रेस चित्रपट व टीव्ही संघटनेचे नाईक म्हणाले आहेत. 

टॅग्स :देवासिनेमा