Join us  

सोशल मीडियाद्वारे मराठी भाषा अधिक समृद्ध होईल- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 4:30 AM

माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मुंबई : आजची तरुणाई सोशल मीडिया या माध्यमाला आपलेसे करून यावर अधिक उत्तमपणे व्यक्त होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेला महापूर. या महापुराच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखविल्याच पण सोशल मीडियावर तर विविध मजकूर, बातम्यांचा महापूर पाहायला मिळाला आणि त्यामुळे या माध्यमाचे अस्तित्व आपण नाकारून चालणार नाही. कारण हे माध्यम केवळ तरुण पिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, लोकशाही व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी नमूद केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पहिल्या राज्यस्तरीय मराठी सोशल मीडिया संमेलनाचे शनिवारी उद्घाटन झाले. सोशल मीडियावर लिहिला जाणारा मजकूर हा साहित्याचा प्रकार आहे. अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया हे पूरक व्यासपीठ आहे, त्यामुळे मराठी भाषा प्रेमींनी सोशल मीडियावरील मराठी साहित्यामध्ये विशेष रुची घेतली पाहिजे आणि या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे; ज्यामुळे मराठी भाषा मराठी भाषिकांपर्यंत अधिक ताकदीने पोहोचविण्यामध्ये आपण यशस्वी होऊ व मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नमाहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यात मराठी भाषा विभागामार्फत प्रचलित साहित्यिक आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्य शासन पहिल्या सोशल मीडिया संमेलनाच्या पाठीशी असून आगामी काळात हे माध्यम सशक्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :विनोद तावडे