मराठी नाट्यनिर्मात्याच्या घरावर हल्ला
By Admin | Updated: July 18, 2015 01:38 IST2015-07-18T01:38:31+5:302015-07-18T01:38:31+5:30
दहिसरमध्ये गोविंद चव्हाण या मराठी नाट्यनिर्मात्याच्या घरावर स्थानिकांकडून हल्ला करण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी नाट्यनिर्मात्याच्या घरावर हल्ला
- दहिसरमधील घटना
मुंबई : दहिसरमध्ये गोविंद चव्हाण या मराठी नाट्यनिर्मात्याच्या घरावर स्थानिकांकडून हल्ला करण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दहिसर पश्चिमच्या आर. के. मार्ग येथील बोना व्हेंचर इमारतीच्या बी विंगमध्ये गोविंद चव्हाण त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या पत्नीने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या वीस ते पंचवीस अमराठी रहिवाशांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्या. तसेच त्यांना आणि त्यांच्या मुलीला (सुप्रिया) मारहाण केली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना पोलिसांनादेखील चपला काढून दाखविल्या.
या घटनेत मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचेही त्या म्हणाल्या. दोन वर्षे चव्हाण कुटुंब या इमारतीमध्ये राहत आहे. वर्षभरापासून त्यांना अशाच प्रकारे त्रास दिला जात असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच गुरुवारी पोलीस ठाण्यातही हा जमाव चव्हाण कुटुंबीयांना शिवीगाळ करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज या कुटुंबाकडे उपलब्ध असल्याचे सुप्रियाने सांगितले.
चव्हाण कुटुंबीय मांसाहारी असून त्यांच्या इमारतीत नव्वद टक्के लोक हे शाकाहारी आहेत. चव्हाण कुटुंबीय अंड्याची साले, घाण पाणी आमच्यावर उडवतात, असे त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे आंदोलन
गोविंद चव्हाण हे नाट्यनिर्माते आहेत. त्यांनी यूटर्न, कथा, वन रूम किचन तसेच मदर्स डे या नाटकांची निर्मिती केली आहे. या घटनेची माहिती मिळताच दहिसरच्या सोसायटीसमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. मात्र पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करीत जमावाला पांगवले.