Join us  

मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांत मराठी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 1:05 AM

आजपासून होणार प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वावरील सीबीएसई आणि आयसीएसई शाळा अनुक्रमे एप्रिल आणि जून, २०२० पासून सुरू होत असून, यासाठीची प्रवेश अर्ज प्रक्रिया आज २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पद्धतीने कार्यरत राहणार असून, पालकांना १२ मार्चपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. मुंबई पब्लिक स्कूलअंतर्गत येणाऱ्या या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या असल्या, तरी तृतीय भाषा म्हणून मराठी भाषा विषय सक्तीचा असणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पूनमनगर (सीबीएसई) आणि एमपीएस वुलन मिल (आयसीएसई) या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पुढे यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढून एका वर्गामध्ये १० किंवा त्याहून अधिक झाल्यास, येथे तिसरी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या शाळांसाठी प्रत्येक वर्गासाठी ४० हून अधिक प्रवेशिका आल्यास यासाठीच्या प्रवेशाची यादी लॉटरी पद्धतीने जाहीर होणार आहे. याचसोबत सध्या पालिकेच्या शाळांत शिकणाºया विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पालिका शिक्षण विभागाकडून मिळतात, त्या सुविधा या शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.१३ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत अर्जांची छाननी प्रक्रिया होऊन विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत शाळांच्या अभ्यासक्रमाचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर, २४ मार्च रोजी पहिली यादी आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पद्धतीने जाहीर करण्यात येईल. गरज भासल्यास लॉटरी पद्धतीने २६ ते २८ मार्चच्या दरम्यान लॉटरी पद्धतीही राबविण्यात येणार आहे. लॉटरीनंतरच्या दुसºया दिवशी अंतिम यादी जाहीर करून, ३१ मार्च रोजी प्रवेशांना सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या प्रवेशप्रक्रियेदरम्यान शाळेच्या परिसरातील ३ किमी परिसरात राहणाºया विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.१२ शिक्षकांसाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू!या शाळांसाठी शिक्षकांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेमध्ये सध्या सेवा देत असलेल्या शिक्षकांपैकीच इच्छुक शिक्षकांना यासाठी नियुक्त केले जाणार आहे. इच्छुक शिक्षकांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी पात्र शिक्षकांची निवड करून, त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर, उत्तीर्ण होणाºया शिक्षकांची मुलाखत घेतली जाईल. यातून दोन्ही शाळांसाठी १२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :मराठीशाळा