'सातपुडा सुपर सेव्हियर'च्या प्रोमोचे सोनाली कुलकर्णीच्या हस्ते अनावरण

By संजय घावरे | Published: March 4, 2024 04:59 PM2024-03-04T16:59:52+5:302024-03-04T17:01:08+5:30

रुग्णवाहिका चालक व सेवा प्रदात्यांवर आधारलेली माहितीपट सिरीज.

marathi cinema actress sonali Kulkarni unveils the promo of satpuda super savior in mumbai | 'सातपुडा सुपर सेव्हियर'च्या प्रोमोचे सोनाली कुलकर्णीच्या हस्ते अनावरण

'सातपुडा सुपर सेव्हियर'च्या प्रोमोचे सोनाली कुलकर्णीच्या हस्ते अनावरण

संजय घावरे, मुंबई : कोरोनाच्या काळातील कधीच विसरता न येणाऱ्या काही आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. या अवघड काळात मनुष्यधर्माचे पालन करत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदात्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या 'सातपुडा सुपर सेव्हियर' या माहितीपट सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या प्रोमोचे अनावरण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते करण्यात आले.

कोविड –१९च्या संकटकाळात अनेक रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते कोरोनायोद्धा म्हणून लढले, त्यांची रुग्णवाहिका ही जीवनवाहिनी ठरली. जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे महत्वाचे काम रुग्णवाहिकांनी केले. अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या अमूल्य योगदानाबाबत नाशिक येथील सातपुडा इंजिनिअरिंग हि रुग्णवाहिका स्ट्रेचर निर्माण कंपनी 'सातपुडा सुपर सेव्हियर' या माहितीपट मालिकेची निर्मिती करत आहे. या माहितीपटाच्या प्रोमोचे उद्घाटन सोनाली कुलकर्णीच्या हस्ते झाले. याप्रसंगी रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदात्यांना 'सातपुडा सुपर सेव्हियर' सन्मान देऊन गौरविण्यात आले. या माहितीपट मालिकेचा प्रोमो सोनाली कुलकर्णीवर चित्रित करण्यात आला आहे. या प्रोमोद्वारे त्यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून लढलेल्या रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते यांच्या उल्लेखनीय कामाची माहिती देऊन रुग्णवाहिका चालक व सेवा प्रदाते यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आठ भागाच्या मालिकेत रुग्णवाहिका चालकांचे वैयक्तिक अनुभव, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले धाडस यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या मालिकेची संकल्पना व दिग्दर्शन तुणीर यांचे असून निर्मिती सातपुडा इंजिनिअरिंगचे केदार पाटील, सतिश पाटील आणि श्रेयस पाटील हे करीत आहेत. या माहितीपट मालिकांचे सर्व भाग सातपुडा इंजिनिअरिंग या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील.

'सातपुडा सुपर सेव्हियर' या उपक्रमाचा उद्देश जे आरोग्य सेवेत पडद्यामागे अथकपणे काम करणाऱ्यांच्या उल्लेखनीय कामांवर प्रकाश टाकून, समाजातील त्यांच्या महत्वाच्या कार्याची जाणीव जनमानसाला करून देणे हा आहे. रुग्णवाहिका संकटकाळात सेवेसाठी सदैव तत्पर असते. त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते खऱ्या अर्थाने 'सेव्हियर' म्हणजे तारणहार आहेत. जीवन वाचविण्यात आणि समाजासाठी योगदान देण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका मान्य केली पाहिजे. हा उपक्रम केवळ त्यांच्या मेहनतीला अधिक बळ देणारा नसून, मनोबल वाढवणाराही आहे.

Web Title: marathi cinema actress sonali Kulkarni unveils the promo of satpuda super savior in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.