Join us  

‘या’ नोकरीला मराठी उमेदवारांना नो एंट्री, ती ही मुंबईत; सोशल मीडियावरील जाहिरातीने वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 7:22 AM

गुजरातमधील एका भरती करणाऱ्या कंपनीच्या एचआरकडून मुंबईतील गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘लिंक्डइन’ या सोशल साइटवर पोस्ट करण्यात आलेल्या जाहिरातीत ‘इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही’ असे वाक्य पोस्ट केल्याने वातावरण तापले आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही जाहिरात पोस्ट करत ‘मुंबईत राहून मराठी माणसाचा द्वेष. धडा शिकवा’, असे आवाहन केले आहे. त्यावरून सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

गुजरातमधील एका भरती करणाऱ्या कंपनीच्या एचआरकडून मुंबईतील गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. साडेचार लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्नही देण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. 

मात्र या जाहिरातीच्या अखेर ‘इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही’ असेही नमूद करण्यात आल्याने वातावरण तापले. विशेष म्हणजे मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुंबईत तेही गिरगावमधील कार्यालयासाठी अशी जाहिरात पोस्ट करण्यात आल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. 

प्रतिक्रिया उमटल्या ही जाहिरात आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करीत याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्याखाली प्रतिक्रियांमागून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

‘तुम्ही जा की धडा शिकवायला. तुमचा पक्ष घेऊन. बहुजनांच्या पोरांना कशाला ढकलता पुढे. तुम्ही काय फक्त मतं गोळा करणार का मराठीच्या नावाने. नवमराठीप्रेमी’, असे म्हणत अभिषेक या एक्स युजरने आव्हाडांनाच सल्ला दिला आहे. अमराठी लोक जर पुन्हा निवडून आले तर पुन्हा मुंबईचा बॉम्बे करणार, अशी भीती नम्रता या युजरने व्यक्त केली आहे. अनेक युजर्सकडून या जाहिरातीविरोधात आवाज उठविण्यात आला असून अशा प्रकारच्या भेदभावाला मुंबईत जागा नाही अशी प्रतिक्रियाही नोंदवली आहे. या जाहिरातीला झालेल्या प्रचंड विरोधानंतर लिंक्डइनवरून ही जाहिरात हटविण्यात आली आहे.  

टॅग्स :मराठीनोकरी