Join us
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीहीनांचे पाक्षिक वार्तापत्र आता लवकरच मराठी ब्रेल लिपीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 02:55 IST

गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत.

- स्नेहा मोरेमुंबई : गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत. ‘आंतरराष्ट्रीय ब्रेल दिना’च्या निमित्ताने नॅब शुभवार्ता घेऊन आले आहे. ‘दृष्टी’ आता लवकरच मराठी ब्रेल लिपीतही प्रकाशित होणार आहे.‘नॅब’च्या वतीने ‘दृष्टी’ हे जगातील पहिले नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक प्रकाशित केले जाते. २००३ सालापासून सुरू झालेले हे पाक्षिक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला हिंदी ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित करण्यात येते. भारतासह जगभरात आॅस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, इस्रायल, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, नायजेरिया, रुस, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि श्रीलंकाया देशांमध्ये हे वार्तापत्र वितरित करण्यात येते. या वार्तापत्रात क्रीडा, राजकारण, करमणूक, पाककृती, सामान्य ज्ञान अशा विविध क्षेत्रांविषयी लिहिले जाते. या पाक्षिकाचे जगभरातील जवळपास ३ हजार ६७६ वाचक आहेत.या प्रकल्पाविषयी ‘नॅब’चे सचिव सुहास कर्णिक यांनी सांगितले की, वृत्तपत्र हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. हाच मुख्य विचार करून ‘दृष्टी’ या पाक्षिकाचा जन्म झाला. दृष्टिहिनांपर्यंत सर्व क्षेत्रांतील घडामोडी पोहोचव्यात यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. या प्रकल्पाला जगभरातील वाचकांनी प्रतिसाद दिल्याने आता लवकरच हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक मराठीत येणार आहे.दृष्टीहीनांसाठी उपयुक्त उपक्रमसोशल मीडियामुळे बऱ्याच रोजच्या घडामोडी काही वेळातच सर्वत्र पसरतात. मात्र दृष्टिहीन वाचक यापासून वंचित असतात. त्यामुळे या वाचकांसाठी‘दृष्टी’ हा अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. मात्र याप्रमाणे हा प्रकल्प अधिकाधिक विस्तारण्यासाठी ब्रेल लिपीसाठी लागणाºया कागदाची उपलब्धता, संस्थेला वेळेवर अनुदान देणे आणि टॉकिंग कॉम्प्युटर्स उपलब्ध करून देणे या शासनाकडे प्रमुख मागण्या आहेत, असे नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई