माओवादी प्राध्यापकाला व्हील चेअरवर आणले न्यायालयात

By Admin | Updated: May 10, 2014 23:52 IST2014-05-10T23:48:34+5:302014-05-10T23:52:18+5:30

नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला शनिवारी पोलिसांनी अहेरी तालुका न्यायालयात हजर केले.

Maoists take professor to wheelchair in court | माओवादी प्राध्यापकाला व्हील चेअरवर आणले न्यायालयात

माओवादी प्राध्यापकाला व्हील चेअरवर आणले न्यायालयात

अहेरी : जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रीय असलेला आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला शनिवारी पोलिसांनी अहेरी तालुका न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २१ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गडचिरोली पोलीस पथकाने दिल्ली येथून साईबाबाला शुक्रवारी अटक केली. तेथून त्याला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शनिवारी दुपारी अहेरी पोलिसांनी अहेरी उपजिल्हा रूग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली. ९० टक्के अपंग असलेल्या ४७ वर्षीय साईबाबाला व्हील चेअरवर रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत अहेरीचे पोलीस उपनिरीक्षक बलभीम नन्नावरे यांच्यासह पोलीस पथक होते. त्यानंतर येथे वैद्यकीय तपासणी पार पडल्यानंतर अहेरी तालुका न्यायालयात न्यायाधीश एन. जी. व्यास यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले. यावेळी साईबाबा व्हील चेअरवरच बसून होता. त्याच्याविरूद्ध यू. ए. पी. अ‍ॅक्टच्या १३, १८, २०, ३८, ३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश व्यास यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रा. साईबाबाला २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी प्रकरणाचे तपास अधिकारी, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे हे स्वत: न्यायालयात हजर होते. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. जगदीश मेश्राम यांनी बाजू मांडली. यावेळी साईबाबा यांनी न्यायाधीशांना आपण अपंग असल्याचे कारण सांगून पाश्चिमात्य शैलीचे बाथरूम व दोन हेल्पर आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी केली. आरोपी साईबाबाला न्यायालयीन कोठडीदरम्यान नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे हे गेल्या ११ महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करीत होते. याप्रकरणी आणखी बरीच माहिती पुढे येईल, असा विश्वास त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. न्यायालयात उपविभागीय पोलीस अधिकारी धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक बलभीम नन्नावरे उपस्थित होते. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Maoists take professor to wheelchair in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.