चाळींच्या प्रभागामुळे अनेक समस्या

By Admin | Updated: July 7, 2015 00:29 IST2015-07-07T00:29:29+5:302015-07-07T00:29:29+5:30

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या ‘ब’ प्रभाग क्षेत्रकार्यालयांतर्गत २७ चिकणघर या प्रभागाचा अंतर्भाव होत असून या प्रभागात मूळ चिकणघर गावठाणसह गणेशनगर, मिलाप सोसायटी,

Many problems due to the chali disaster | चाळींच्या प्रभागामुळे अनेक समस्या

चाळींच्या प्रभागामुळे अनेक समस्या

अरविंद म्हात्रे  चिकणघर
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या ‘ब’ प्रभाग क्षेत्रकार्यालयांतर्गत २७ चिकणघर या प्रभागाचा अंतर्भाव होत असून या प्रभागात मूळ चिकणघर गावठाणसह गणेशनगर, मिलाप सोसायटी, श्रीरामनगर, छोटा आणि मोठा म्हसोबानगर, गोकुळ वर्षा कॉलनी, गजानन हॉस्पिटल परिसर, जीवन संध्या सोसायटी, एकविरा कॉलनी, भरत भोईर पार्क, हायवे रोड लगतची कातकरी वाडी, लॉर्ड शिवा पॅलेस परिसर आणि हॉलीक्रॉस शाळे जवळचा काही भाग असा परिसर आहे. या प्रभागात अर्ध्याहून अधिक चाळींचा समावेश असल्याने समस्या अनेक आहेत. हॉलीक्रॉस ते चिकणघर गावठाण हा रस्ता जागोजागी खड्ड्यांनी भरलेला आहे. याचबरोबर उपनिबंधक कार्यालयाजवळ कचरा साठलेला नेहमीच असतो. कोकण वसाहत समोरील वामनराव पै उद्यानाजवळून एकाकडेला गटारीच्या खोदकामानंतर खडी तशीच असल्याने चालणाऱ्या नागरीकांची घसरगुंडी होते.
गावठाण परिसरामध्ये गटारींची कामे बरीच बाकी आहेत. हायवेकडून गावातल्या चक्की जवळून एक रस्ता हॉलीक्रॉस शाळेमार्गे संतोषीमाता रोडला मिळतो. तर दुसरा जीवनसंध्या सोसायटीकडे जातो. हा रस्ता दत्तमंदिरा पुढे नादुरुस्त आहे. तर दत्तमंदिराच्या समोरून मुरली भोईर यांच्या घराकडे जाणारी गल्ली मातीचीच आहे. येथे पायवाट विकसीत झालेली नाही. याकडे नगरसेवकांचे लक्ष नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे.
ब प्रभाग कार्यालयाकडून गावातून शहराकडे जाणाऱ्या अरुंद गल्ली सदृष्य रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण वाढल्याने हा गावातला रस्ता खूपच वर्दळीचा असतो. यामुळे ध्वनी आणि वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली असून अपघातांची भीती वाढली आहे. लहानमुले दारांजवळ खेळताखेळता रस्त्यावर आल्यास अपघाताची भीती आहे. दोन वर्षापूर्वी येथे एका चिमुरडीचा अपघात होऊन जीव गमवावा लागला होता. या रस्त्यास पर्याय म्हणून छत्री बंगल्याजवळून नवीन डी.पी. रस्ता मंजूर झालेला आहे. परंतु त्याचे काम २०११ पासून अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे जोपर्यंत नवीन डी.पी. पूर्ण होत नाही. तोपर्यंत गावातील रस्त्याचाच वापर होऊन अपघाताची टांगती तलवार कायम राहण्याची चिन्हे आहेत. याचबरोबर येथूनच आणखी एक नवीन डी.पी. रोड रामबाग चारकडे जात आहे. त्याची अवस्थाही वाईटच आहे. याकडे ब प्रभाग अधिकारी, नगरसेवक का लक्ष देत नाहीत. असे नागरीक विचारीत आहेत.
या प्रभागात उद्याने, खेळाची मैदाने आणि वाचनालय झालेली असली तरी दैनंदिन साफसफाईची ओरड नागरीकांकडून होत आहे. या प्रभागात जूनी कातकरीवाडी आहे. येथे उघड्या गटारी, कचऱ्याचे ढिग नजरेस पडतात. सफाई कामगार येतच नाहीत यामुळे आदीवासी-कातकरींचे आरोग्यधोक्यात आले आहे. मनपा क्षेत्रातील या कातकरीवाडीत मनपाचे अजिबात लक्ष नसल्याने या वाडीची दुरावस्था आहे.

Web Title: Many problems due to the chali disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.