Join us
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांवर 'निर्भया'चा वॉच, पोलीस दीदींमुळे अनेक गुन्ह्यांना फुटली वाचा, महिलांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:48 IST

निर्भया तसेच पोलीस दीदींमुळे अनेक गुन्ह्यांना वाचा फुटतानाही दिसत आहे. 

मुंबई

महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकामुळे कुठे हरवलेली नाळ जुळताना दिसतेय, तर कुठे रात्री-अपरात्री बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई पोलिसांचे निर्भया पथक आधार ठरताना दिसत आहे. निर्भया तसेच पोलीस दीदींमुळे अनेक गुन्ह्यांना वाचा फुटतानाही दिसत आहे. 

मुंबईतल्या महिलांसंबंधित घडलेल्या गुन्ह्याच्या आधारावर निर्जनस्थळी, धोकादायक अशी ठिकाणे निवडून त्याठिकाणी क्यूआर कोड लावून गस्तीवर भर देण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत अशी ३० ते ४० ठिकाणे असून त्यानुसार हे पथक साध्या गणवेशात छुप्या कॅमेरांसह टवाळखोरांवर लक्ष ठेवून आहेत. तसेच अनेकदा कॉर्पोरेट सेक्टर, शाळा, महाविद्यालयांतील महिला पुढे येत नाही. अशा ठिकाणी महिला पथक जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

प्रत्येक ठाण्यात स्वतंत्र कक्षप्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र महिला कक्ष उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. नागपाडा पोलीस ठाण्यापासून याची सुरुवात करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटनही करण्यात आले आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर स्वतंत्र पेज...पथकाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवर देखील त्याचे स्वतंत्र पेज सुरू करण्यात आले आहे. तसेच निर्भया पथकाची देणारी पुस्तिकाही सर्वत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

असे करतात काम...१. हे पथक मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली दोन महिला आणि दोन पुरुष अंमलदार तैनात आहेत. 

२. या दरम्यान छुप्या कॅमेऱ्यांसह स्वतंत्र मोबाइल फोन, वाहने पुरविण्यात आली आहेत. पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनसह १०३ क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 

३. जेणेकरुन महिलांपर्यंत तातडीने पोहोचता येणार आहे. याशिवाय, पोलिसांकडून कार्यशाळांवर भर देण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबई