राजन पाटीलबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी
By Admin | Updated: November 21, 2015 00:15 IST2015-11-20T21:02:03+5:302015-11-21T00:15:28+5:30
दोडामार्ग तालुक्याचा उपअभियंतापदाचा कार्यभार होता. मूळात त्यांच्याकडे दोडामार्ग तालुकाच देण्यात होता.

राजन पाटीलबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी
सावंतवाडी : सावंतवाडीचे उपअभियंता राजन पाटील यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे आता पुढे येऊ लागले असून, दोन दिवसांपूर्वीच दोडामार्ग तालुक्यातील सरपंचानी कार्यकारी अभियंता साळोखे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंत्यांनी पाटील याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीला उत्तरे देण्यापूर्वीच राजन पाटील हा लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे. सावंतवाडीचे उपअभियंता राजन पाटील यांच्याकडे ज्येष्ठतेनुसार सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्याचा उपअभियंतापदाचा कार्यभार होता. मूळात त्यांच्याकडे दोडामार्ग तालुकाच देण्यात होता. मात्र, अलिकडे उपअभियंतापदाचा प्रभारीपदाचा कार्यभार देण्यात आला होता. दोडामार्गमधील अनेक कामे राजन पाटील याने ठेकेदारांकडून पूर्ण करून घेतली. मात्र, त्यांना बिल अदा करीत असताना अनेक अडचणी आणत असे. कोणतेही बिल चिरीमिरीशिवाय पुढे जात नव्हते. तसेच नवीन कामे कोणाला द्यायची, यावरही पाटीलची टक्केवारी होती. अनेक कामे याच प्रकारामुळे ठेकेदार करीत नसत. विकासाची कामे होत नसल्याने सरपंचही पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत असत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता साळोखे यांची भेट घेतली होती. तसेच पाटील याच्या कामातील दिरंगाईबाबत जोरदार तक्रारीचा सूर आळवला होता. या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंत्यांनी पाटील याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच आठ दिवसात उत्तरे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर देण्यापूर्वीच पाटील जाळ्यात अडकला. (प्रतिनिधी)
अधिकारी नसल्याने कार्यभार दिला : साळोखे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपअभियंता तसेच शाखा अभियंता अशी अनेक पदे रिक्त असून, कोणी अधिकारी येत नसल्यानेच आम्हाला प्रभारी कार्यभार द्यावा लागतो. पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. आम्ही त्याबाबत चौकशीही करीत होतो. मात्र, कोण सक्षम अधिकारी नसल्याने आम्हाला काही करता येत नसल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता साळोखे यांनी स्पष्ट केले.