Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनेक उमेदवार एमपीएससी परीक्षेस मुकले, 5-10 मिनिटांचा उशीरही मारक ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:15 IST

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा (एमपीएससी) पेपर सकाळी १० वाजता सुरू होणार असला तरी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची अंतिम वेळ ९.३० ठरविण्यात आली होती.

मुंबई : राज्यभरातील केंद्रांवर रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. मात्र, मेगाब्लॉकमुळे मुंबईत काही उमेदवारांना ‘रिपोर्टिंग टाइम’पर्यंत पोहोचता न आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्यांना परीक्षेस मुकावे लागले.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा (एमपीएससी) पेपर सकाळी १० वाजता सुरू होणार असला तरी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची अंतिम वेळ ९.३० ठरविण्यात आली होती. मेगाब्लॉक आणि अन्य काही अडचणींचा उमेदवारांना सामना करावा लागला. बरेच जण केवळ ५ ते १० मिनिटे उशिरा पोहोचले होते. सिडनहॅम कॉलेज केंद्रावर १५ उमेदवारांसोबत असाच प्रकार घडला. 

औरंगाबादला २८ टक्के विद्यार्थ्यांची दांडीnऔरंगाबाद शहरातील ४६ केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली. १५ हजार २०६ उमेदवारांपैकी सकाळच्या सत्रात दहा हजार ९२७, तर दुपारच्या सत्रात दहा हजार ८८१ उमेदवारांनी परीक्षा दिली. सरासरी ७१.७० टक्के उमेदवारांंनी परीक्षा दिली तर २८.३० टक्के विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

पहिला पेपर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कठीण होता. विज्ञान, इतिहास आणि भूगोल विषयाचे पेपर कठीण होते. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सी-सॅटचा पेपर सोपा होता. त्यामुळे यंदा मेरिट वाढू शकते.- नितीन मेटे, उमेदवार, पुणे

टॅग्स :एमपीएससी परीक्षा