कारखानदारांच्या समस्या सुटणार!

By Admin | Updated: July 1, 2014 23:10 IST2014-07-01T23:10:03+5:302014-07-01T23:10:03+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडे उत्पादन क्षमता उत्तम असली तरी कारखानदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

Manufacturers' problems will be resolved! | कारखानदारांच्या समस्या सुटणार!

कारखानदारांच्या समस्या सुटणार!

संदीप जाधव, महाड
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडे उत्पादन क्षमता उत्तम असली तरी कारखानदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या प्राधान्याने सोडवून महाड उत्पादक संघटनेला सर्वप्रकारचे सहकार्य करणार असल्याची ग्वाही, ‘लोकमत-एडिटर्स मिट वीथ महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ या आगळ््या उपक्रमात बोलताना रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली. यावेळी लोकमत मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक विनायक पात्रुडकर, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (एमएमए) अध्यक्ष सुरेश भोसले, उपाध्यक्ष एस.बी.पाठारे व राजीदंर हरकरा, पोलीस उपअधीक्षक शिवाजीराव देशमुख, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांच्यासह महाड औद्योगिक वसाहतीत एमएमए सदस्य कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्पादक संघटनेच्या समस्या सोडवण्यासाठी ‘लोकमत’ ने उपलब्ध करुन दिलेल्या या व्यासपीठाचे एक अत्यंत गरजेचा व स्तुत्य उपक्रम असल्याचे कौतुक यावेळी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले. या औद्योगिक वसाहतीत अग्निशमन यंत्रणा ठप्प झाल्याने उत्पादकांपुढे मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मात्र येत्या काही दिवसात महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करुन यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे भांगे यांनी सांगितले.
एमएमए अध्यक्ष सुरेश भोसले यांनी औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्र, रुग्णालय, सीबीएससी स्कूल, ट्रक टर्मिनस, स्टेडियम, कॉमन इफ्लूएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट, बीएसएनएल सेवा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीविषयक अत्यंत गंभीर व महत्त्वाच्या समस्यांबाबत विवेचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत लक्ष्मी आॅरगॅनिक केमिकल्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अ‍ॅड.विनोद देशमुख, उत्पादक संघटनेचे सचिव के.व्ही.आपटे आदींनी अभ्यासपूर्वक मुद्दे मांडले.
महाड औद्योगिक वसाहतीत ल्युबस्टार पेट्रोकेमिकल्सचे संचालक सुदाम बी यादव यांना जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सर्वोकृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याहस्ते यादव यांचा उत्पादक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

Web Title: Manufacturers' problems will be resolved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.