लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी ओला, उबर अशा ॲप आधारीत टॅक्सी सेवांचा आधार घेतला. मात्र, एकच वेळेस अनेकांनी टॅक्सी बुक करण्यास सुरुवात केल्याने ती बुक होत नव्हती. त्यामुळे काळी पिवळी टॅक्सीचा अनेकांना आधार घ्यावा लागला. पण, या टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू होती.
सकाळी शहरात अडकलेल्यांनी परत घरी जाण्यासाठी लोकल किंवा ॲप आधारीत टॅक्सी उपलब्ध नसल्याने काळी पिवळी टॅक्सीचाच त्यांच्यासमोर पर्याय होता. याचा गैरफायदा घेत अनेक चालकांनी मीटरऐवजी दुप्पट ते तिप्पट भाडे आकारले. काही प्रवाशांनी सांगितल्यानुसार, मंत्रालय परिसरातून मुलुंडपर्यंत येण्यासाठी टॅक्सी चालकाने ६०० रुपये सीट याप्रमाणे चौघांचे २,४०० रुपये घेतले. परतीच्या प्रवासाला टॅक्सीचालक मीटरप्रमाणे होणाऱ्या पैशांच्या वर दोनशे ते तीनशे रुपये आकारत होते. पावसामुळे सार्वजनिक वाहतुकीचे सर्व पर्याय ठप्प असल्याने प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागला.
रिक्षाचालकांचाही ‘मीटर’ला नकार
रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्याकडून जादा भाडे आकारले. अनेक चालकांनी मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देत थेट भाडे आकारले. जवळच्या प्रवासाला शंभर ते दोनशे रुपये घेत होते. मात्र, पाऊस सुरू असल्याने लोकांचाही नाईलाज होता. पाऊस वाढेल या भीतीने अनेकांनी रिक्षाचालकांनी मनमानी सहन केली.