दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील जवळपास सहा ते सात वर्षांपासून रखडलेला येथील विधानभवनाजवळील मनोरा आमदार निवासाचे बांधकाम जानेवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष सुरू होणार आहे. यापूर्वी मनोरा आमदार निवासाच्या बांधकामासाठी काढलेली निविदा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी फेरनिविदा काढल्यानंतर तीन कंपन्यांनी निविदा भरली आहे. लवकरच ही निविदा उघडण्यात येणार असून याबाबतची सर्व प्रक्रिया पार पाडून जानेवारीमध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.
मनोरा आमदार निवासाची इमारत निकृष्ट बांधकामामुळे धोकादायक झाली होती. जुलै २०१७ साली ही इमारत पाडण्यात आली. त्यावेळीच या जागेवर भव्य टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या इमारती पाडल्यानंतर २०१९ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाची एकही वीट रचली गेलेली नाही.नव्याने काढण्यात आलेल्या निविदा तीन मोठ्या बांधकाम कंपन्यांनी भरल्या आहेत. यात एल. ॲण्ड टी., टाटा हाऊसिंगआणि शापूरजी पालनजी यांचा समावेश आहे.
काम रखडल्याचा असाही फायदासीआरझेडचा (सागरी हद्द नियंत्रण कायदा २०१९) सुधारित कायदा लागू झाल्याने त्याचा फायदा मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाला होणार आहे. समुद्राच्या भरती रेषेपासून ५० मीटरनंतर आता बांधकाम करता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा ५०० मीटरपर्यंत होती. मनोरा आमदार निवास समुद्रकिनारी असल्याने आता या नव्या बदलामुळे आमदार निवासासाठी ७० ते ८० हजार चौरस मीटर अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. या जागेवर नव्या सुविधा दिल्या जाणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
मनोरा आमदार निवासाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे यासाठी आम्ही निविदा प्रकाशित केली होती. याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये आमदार निवासाचे बांधकाम सुरू होऊन पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. - राहुल नार्वेकर,विधानसभा अध्यक्ष