Join us  

मुंबईकरांना ३ ते ६ जानेवारी दरम्यान घेता येणार साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 4:42 PM

माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे.  यंदा ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे.

ठळक मुद्देमाणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे. ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. साताऱ्यातील माण गाव मुंबईकरांच्या भेटीला आले आहे असा अनुभव यावा म्हणून गावकडची संस्कृती दाखविणारा देखावा उभारणार आहे.

मुंबई - माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे.  यंदा ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, जेष्ठ समाजसेविका मा.डॉ.श्रीमती सिंधुताई सपकाळ(माई), उद्योगमंत्री मा. ना. सुभाष देसाई  प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.

काय आहे यंदा माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी

प्रत्यक्षात साताऱ्यातील माण गाव मुंबईकरांच्या भेटीला आले आहे असा अनुभव यावा म्हणून गावकडची संस्कृती दाखविणारा देखावा उभारणार आहे. गावाकडचे दिपस्तंभ, किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे. मुंबईकरांना महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. यंदा मसाले तुम्हाला स्वतः तयार करता येणार आहेत. कारण जात्याच्या उपयोग करुन तुम्हाला मसाले स्वतः देखील करता येणार आहेत. या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी बिहार येथील मधुबनी, खणाच्या साड्या, कसुती वर्क (लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे कपडे)आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

यंदाची  खासीयत -  सुफी संगीताचा लाइव्ह अनुभव सोनम कार्लरा यांच्यासोबत घेता येणार आहे. तर मृदुला दोढे जोशी यांच्या संगीतामध्ये मंत्रमुग्ध होता येणार आहे. 

मुंबईकरांना गावाकडील संस्कॄतीचा प्रत्यक्ष अनुभव

महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता.

दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.

माणदेशी महोत्सवातील यंदाचे मुख्य आकर्षण

यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण माणतालुक्यातील आर.जे केराबाई यांच्या त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या सीडीचे उद्घाटन होणार आहे. तर सामाजिक संदेश देणाऱ्या पथनाट्याचा प्रयोग होणार आहे. तसेच प्रसिद्ध गायक मृदुला दाढे-जोशी आणि केराबाई यांची संगीत जुगलबंदी एकायला मिळणार आहे.  

माणदेशी फाऊंदेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा या जानेवारी २०१८ मध्ये दावोस-स्विझर्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सह-अध्यक्ष आहेत. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून ३००,००० महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले व्यवसाय यशस्वी केले आहेत. सध्या महाराष्ट्र, दादरा, नगर-हवेली, कर्नाटकमध्ये माणदेशी फाऊंडेशन एकून ११ व फिरत्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या ६ शाखा आहेत

टॅग्स :सातारा परिसरमुंबई