मानखुर्द जोडरस्त्यावरील मृतदेहाचे गूढ उकलले; अवैध संबंधांतून हत्या
By Admin | Updated: January 11, 2015 01:23 IST2015-01-11T01:23:55+5:302015-01-11T01:23:55+5:30
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ मुंबई गुन्हे शाखेने उकलले आहे. हा मृतदेह ताडदेवला राहणाऱ्या प्रसाद मांडवकर (२५) याचा होता.

मानखुर्द जोडरस्त्यावरील मृतदेहाचे गूढ उकलले; अवैध संबंधांतून हत्या
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ मुंबई गुन्हे शाखेने उकलले आहे. हा मृतदेह ताडदेवला राहणाऱ्या प्रसाद मांडवकर (२५) याचा होता. घटस्फोटीत महिलेशी दोन मित्रांचे असलेले अवैध संबंध, या संबंधांमधून एकमेकांबद्दल निर्माण झालेली असूया यातून प्रसादची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.
समीर वसंत रोहीकर (३३), रोहित बंगेरा (१९) आणि जॉर्ज अरुण फर्नांडीस (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी समीर हा या हत्याकांडातला मुख्य आरोपी आहे. समीर आणि प्रसाद हे दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. प्रसादने जर्नालिझमचा आणि फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र तो बेरोजगार होता.
समीर हा पेशाने चालक आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्याचे एका घटस्फोटीत महिलेशी संबंध होते. याच महिलेशी प्रसादचीही ओळख झाली. गेल्या काही दिवसांपासून प्रसादचेही या महिलेशी संबंध निर्माण झाले. ही बाब समीरलाही माहीत होती. मात्र महिला आणि प्रसाद यांच्यातली मानसिक जवळीक समीरला खटकू लागली. समीरचा जळफळाट होऊ लागला. अखेर त्याने प्रसादचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
कामाच्या निमित्ताने समीर आणि अन्य आरोपी रोहित, जॉर्ज यांच्याशी मैत्री होती. ८ जानेवारीला डहाणूला राहणाऱ्या आणि सॅण्डविचची गाडी चालविणाऱ्या जॉर्जला घरी सोडू या अशी टूम समीरने काढली. रोहितलाही त्याने सोबत घेतले. तसेच फोन करून प्रसादलाही बोलावून घेतले. यानंतर चौघे हॉटेलमध्ये जेवले. पुढे ज्युस पिण्याच्या निमित्ताने चौघे पुन्हा थांबले. तेव्हा मात्र समीरने प्रसादच्या ज्युसमध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले. प्रसादला गुंगी आली. तेव्हा गाडीत कोंबून समीरने पुढील प्रवास सुरू केला. मध्येच त्याने इंजेक्शनमध्ये अॅसिड भरले आणि ते प्रसादच्या मानेत खुपसले. यामुळे प्रसादची तब्येत बिघडली, मात्र तो जिवंत होता. हे पाहून जोडरस्त्यावर एका निर्जनस्थळी गाडी थांबवून प्रसादला उतरविले. तेथे समीरने आधीच विकत घेतलेल्या चॉपरने प्रसादवर सपासप वार केले. हत्येनंतर तिघेही तेथून पसार झाले.
दोघे अनभिज्ञ
गुन्ह्यात अटक झालेल्या जॉर्ज आणि रोहित या दोघांना अखेरपर्यंत समीरचा कट माहीत नव्हता. जेव्हा त्याने प्रसादच्या मानेत अॅसिडचे इंजेक्शन खुपसले तेव्हा दोघेही स्वस्थ झाले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र समीरने त्याही परिस्थितीत दोघांना ब्लॅकमेल केले. याला जिवंत सोडले तर तिघेही लटकू, असे सांगत समीरने दोघांना गप्प केले, अशी माहिती मिळते. (प्रतिनिधी)
वार्ताहरामुळे लागला शोध : प्रसादचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. म्हणून पोलिसांनी मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅपवरून पसरवला. हा फोटो फिरता फिरता वार्ताहरापर्यंत पोहोचला.
हा फोटो आसपास राहणाऱ्या प्रसादचाच, हे त्याने ओळखले आणि तत्काळ गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.