महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. परप्रांतीय, धर्म, भाषा, जात यावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मात्र, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा, चांगले अन्न, भाजीपाला या गोष्टींबद्दल कोणीही काहीही बोलायला तयार नाही. या निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर लढवल्या जाव्यात, यासाठी आम्ही महामुंबईतील पाच मान्यवर पद्मश्री विजेत्यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित केले. त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. सर्वच राजकीय पक्ष याची दखल घेतील की जो गोंधळ सुरू आहे तो वाढवत नेतील? याचे उत्तर मुंबईकरांना येणारी निवडणूकच देईल.
पद्मश्री डॉ. अमित मायदेव(पोटविकार तज्ज्ञ, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी व एंडोस्कोपी क्षेत्रात आधुनिक पद्धतींचा प्रसार. २०१३ मध्ये भारत सरकारकडून गौरव.)- अतितात्काळ रुग्णाला तातडीने उपचार देण्यासाठी ‘गोल्डन अवर’च्या धर्तीवर आरोग्य व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.- शहरातील रस्ते, जे मुंबईकरांची लाईफलाईन आहेत, ते तातडीने सुधारण्याची गरज आहे. - नायर, केईएम आणि सायन या महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. या रुग्णालयांचे बळकटीकरण केले पाहिजे.- एखाद्या उपकरणाचा काही पार्ट बिघडला तर तो मिळविण्यासाठीची फाईल पुढे सरकायला एका वर्षाहून अधिक काळ लागतो. हे थांबावे.
पद्मश्री डॉ. जहीर काझी(शिक्षण तज्ज्ञ, रेडियोलॉजिस्ट. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २०२४ मध्ये भारत सरकारकडून गौरव.)- मराठी शाळा बंद पडत असून मराठी शिक्षणावरील खर्च कमी झाला आहे. पालिकेने प्राथमिक शिक्षणासाठी पुरेसा निधी द्यावा.- लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. रुग्णालयात रुग्ण जमिनीवर झोपलेले दिसतात. असे व्हायला नको.- अनाथालयातील मुलांना १८ वर्षांचे झाल्यानंतर उच्च शिक्षणाची संधी आणि त्याच्या डोक्यावर छप्पर महापालिकेने करून द्यावे.- प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डात एक सार्वजनिक वाचनालय सुरू करायला हवे.
पद्मश्री अच्युत पालव(सुलेखनकार, मराठी तसेच भारतीय भाषांमधील अक्षरलेखन कला लोकप्रिय करण्यासाठी प्रसिद्ध. २०२४ मध्ये भारत सरकारकडून गौरव.)- महामार्गांवर नाना, भाऊ, काका यांना शुभेच्छा देणाऱ्या मोठ-मोठ्या बॅनर्समुळे अपघात होतात. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.- लालबाग-परळ भागात अनेक स्थानिक रहिवाशी मंडळांनी मुलांसाठी अभ्यासिका बांधल्या आहेत. अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळावे.- मुंबईत जशी जहांगीर आर्ट गॅलरी किंवा एशियाटिक लायब्ररी आहे, तसे एखादे कला दालन नवी मुंबईकरांना मिळावे.- मुलांना मातृभाषा बोलता, लिहिता यावी म्हणून सुलेखन ही कला शाळांतून सुरू झाली पाहिजे.
पद्मश्री गजानन माने(समाजसेवक, नौदलातून निवृत्तीनंतर ३५ वर्षे कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी वाहून घेतले. २०२३ मध्ये भारत सरकारकडून गौरव.)- ठाणे, नवी मुंबई अशा प्रत्येक पालिकेच्या हद्दीत मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरसारखी सेंटर उभारली पाहिजेत.- प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिक शाळा हवी. सैनिक शाळेसाठी राज्य सरकार निधी देते. त्यासाठीची जागा, सोयीसुविधा महापालिकेने द्याव्यात.- वाया जाणारे पाणी साठवण्यास, वाचवण्यास राज्य शासन व महापालिकांनी विचार करावा. - प्रत्येक महापालिका हद्दीत वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक सामाजिक संस्था आहेत. त्यांच्याकडील चांगल्या कल्पनांचा वापर महापालिकांनी करावा.
पद्मश्री उदय देशपांडे(मल्लखांब प्रशिक्षक, मल्लखांबला मर्यादित खेळापासून आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून ओळख मिळवून दिली. २०२४ मध्ये सरकारकडून गौरव.)- मेट्रो, मोनो, लोकलमधून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यादृष्टीने जीवनाचे महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेने उपाय करावे.- उंच टॉवर्सचा ताण रस्त्यांवर येतो. त्यामुळे चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. शिवाय त्यांची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचीही गरज आहे. - दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत मल्लखांब प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी. - नवीन फ्लायओव्हर्सखालील मोकळ्या जागा महापालिकेने मल्लखांब प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून द्याव्या व मल्लखांबाचा प्रचार-प्रसार करावा.
Web Summary : Padma Shri winners urge focus on essential civic issues, not divisive politics. They highlight needs like healthcare, education, infrastructure, and cultural spaces for Mumbaikars.
Web Summary : पद्म श्री विजेताओं ने विभाजनकारी राजनीति के बजाय आवश्यक नागरिक मुद्दों पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया। उन्होंने मुंबईकरों के लिए स्वास्थ्य सेवा, शिक्षा, बुनियादी ढांचे और सांस्कृतिक स्थानों जैसी आवश्यकताओं पर प्रकाश डाला।