Join us
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:57 IST

चित्रपट, नाट्यकलावंतांच्या नजरेतून काय हवे या महामुंबईला? : लोकसंख्येला आळा घालणे गरजेचे..., नाट्यक्षेत्रासाठी महापालिकांत ‘एक खिडकी’ योजना अमलात आणावी, महापालिकांची नाट्यगृहे अन् थिएटर्स सुस्थितीत असावीत, शाळांसाठी राखीव भूखंड प्रायोगिक तत्त्वावरही कोणाला देऊ नयेत, शाळांत बालनाट्य स्पर्धा घ्याव्यात...

महापालिका शाळेत कलेचा आठवड्यातून एक तास हवा - रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

नाट्यगृहातील स्वच्छता, पार्किंग अशा अनेक समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांवर योग्य मार्ग निघू शकेल, त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी महापालिकेत ‘एक खिडकी’ किंवा एखादा विशेष अधिकारी नेमायला हवा, जो कला क्षेत्राशी निगडित समस्या सोडवू शकेल. मुंबईचा विचार करता सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने मूलभूत सेवा-सुविधांवर येणारा ताण पाहता लोकसंख्येला आळा घालणे गरजेचे आहे, असे वाटते. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी थोडे विकेंद्रीकरण केले तर या प्रश्नाची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल. महापालिका शाळेत कलेचा आठवड्यातून किमान एक तास असावा, नागरिक शास्त्राचा एक तास आणि १०० गुणांसाठी नागरिक शास्त्राचा विषय असावा. मुंबईत इमारत पुनर्विकास करतानाच खेळाची मैदाने अधिकाधिक उपलब्ध करून द्यावी.

महापालिकेत सांस्कृतिक खात्याचा अधिकारी नेमावा - चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

मनपा प्रशासनात सांस्कृतिक खात्याचा एक तरी अधिकारी असायला हवा. शाळेपासून आस्थापनांपर्यंत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज राबवता येतील ते पाहणारे खाते महापालिकेच्या प्रशासनात पाहिजे. बऱ्याच पिढ्या घडविणाऱ्या आविष्कार संस्थेचे उपक्रम शाळेत झाले, पण आज त्यांना सामान ठेवायलाही जागा नाही. महानगरपालिकांनी अशा संस्थांना कामाच्या जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत.  पडून असलेल्या जागांवर छोटी केंद्रे तयार करून त्यांचा उपयोग नानाविध उपक्रमांसाठी करता येईल. पूर्वी महापालिका  शाळांत बालनाट्य स्पर्धा व्हायची. याचे आयोजन चौरंग-आविष्कारसारख्या संस्था चांगल्याप्रकारे करू शकतात. कला क्षेत्रातील लोकांशी विचार विनिमय केला जात नाही. भायखळ्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहांसारखी बरीच नवीन नाट्यगृहे बांधली गेली, पण रंगकर्मींचा सल्ला न घेतल्याने तिथे एकही नाटक होत नाही. यात किती पैसे वाया गेले?

दर एक लाख माणसांमागे एक थिएटर असायला हवेअशोक हांडे, निर्माते, अभिनेते

गुजरातमध्ये जिथे शहर तिथे नाट्यगृह आहे. त्या तुलनेत मुंबईत किती नाट्यगृहे आहेत, याचा विचार करायला हवा. लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृहांची संख्या खूप कमी आहे. दर एक लाख माणसांमागे एक थिएटर पाहिजे. एके काळी कोलकाता नगरी कलेसाठी पोषक होती. तिथून ती मुंबईला आली आणि आता पुन्हा मुंबईबाहेर चाललीय की काय असे वाटते. सांस्कृतिक खात्याला सरकार महत्त्व देत नाही. रंगकर्मींच्या मार्गदर्शनाखाली नाट्यगृहांमध्ये सकारात्मक बदल करायला हवेत. थिएटर हे मनपाच्या कामांचे प्रतिबिंब आहे. नाट्यगृहांमधून किती उत्पन्न मिळते, खर्च किती होतो याचा ताळमेळ बसविण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता बनली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या आवारातील नाटकांच्या बसेससाठी असलेली जागा खासगी पार्किंगला दिली आहे. तिथे आता नाटकाची बस जाऊ शकत नाही. खासगी कंपनीच्या १२०० स्कूटर्स पार्क केलेल्या असतात.

पालिका शाळांच्या रिकाम्या वर्गखोल्या नाट्यसंस्थांना द्या  चिन्मयी सुमीत, अभिनेत्री

मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या इमारती या अत्यंत प्रशस्त आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि मुलांची संख्याही मर्यादित आहे. तर त्या शाळांचा विनियोग मुलांना शिक्षण देण्यासाठी तर करावाच; पण ज्या वर्गखोल्या सध्या उपयोगात आणल्या जात नाहीत किंवा रिकाम्या पडून आहेत, त्या जागांची गरज मुंबई आणि उपनगरातील जागांची कमतरता असलेल्या अनेक नाट्यसंस्था, प्रायोगिक नाट्यसंस्थांना आहे. त्यांना या जागा सांस्कृतिक कार्यशाळा किंवा कला शिक्षण अशा उपक्रमांसाठी वापरण्यास देण्यात आल्या तर त्यातून महापालिकांच्या शाळांना नवी ऊर्जितावस्था प्राप्त होईल. त्याचप्रमाणे कला शिक्षण, सांस्कृतिक शिक्षण याबद्दल समाजात थोडी जागरूकतादेखील निर्माण होईल. महापालिकेची नाट्यगृह, थिएटर्स आहेत ती सुस्थितीत असावीत, जसे की वाहनतळ, स्वच्छतागृह अशा काही मूलभूत सोयीसुविधा उत्तम असाव्या.

‘वीकएंड्स’ बदलण्याचा ‘प्रयोग’ करण्याची गरजशशांक केतकर, अभिनेता

मुंबईत प्रत्येक ठिकाणी बदल गरजेचा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाला मुंबईकर येतो तेव्हा नाट्यगृहात स्वच्छता, वाहनतळ आणि त्या अनुषंगाने सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात. हा प्रेक्षकवर्ग ज्या रस्त्याने येतो तो रस्ता रुंद, खड्डेमुक्त असावा, सोसायटीतून बाहेर पडतानाचा मार्ग सुस्थितीत असावा. नाट्यगृह हे एक उदाहरण झाले, त्याजागी आपण हॉस्पिटल, शाळा, मॉल, थिएटर, खासगी ऑफिस याचा विचार करता लहानसहान सुविधांनी परिपूर्ण असणे किती आवश्यक आहे, ते जाणवते. मुंबईची लोकसंख्या हा एक मोठा विषय असला तरी राज्यातील अन्य भागांचा विकास झाल्यास मुंबईतील गर्दी खूप कमी होण्यास मदत होऊ शकते. मुंबईतील ‘वीकएंड्स’ बदलण्याचीही गरज निर्माण झाली आहे का? याचा विचार व्हावा, कारण आज मनोरंजन आणि शॉपिंग हे तर ऑनलाइन उपलब्ध आहे, त्यामुळे हा एक ‘प्रयोग’ म्हणून करायला हरकत नसावी.

रस्त्यावर लटकणारी ही लक्तरे उतरवणे गरजेचे वाटत नाही का? -रस्त्याच्या कडेला विजेच्या खांबांवर राजकीय फलक लागलेले दिसतात. संबंधित कार्यक्रम झाल्यानंतरही आठ-आठ दिवस ते फलक ऊन-पावसात तसेच असतात, अक्षरशः लक्तरे रस्त्यावर लटकत आहेत, असे वाटते आणि ते अत्यंत वाईट दिसते. ज्यांनी तो लावला त्यांनीच तो कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशीच उतरवायला हवा, हे अपेक्षित आहे.

नाटकांची तारीख रद्द केल्यास त्या  नाट्यसंस्थेला संपूर्ण खर्च द्यावानाटकांना दिलेल्या तारखा राजकीय कार्यक्रमासाठी रद्द करता कामा नयेत. आता ऑनलाइन बुकिंग केले जात असल्याने जाहिरात व इतर खर्चाचा फटका नाट्यसंस्थांना बसतो. तारीख रद्द केल्यास संस्थेला संपूर्ण खर्च दिला पाहिजे. कोविडनंतरच्या काळात मुंबई मनपाने नाटकवाल्यांना गाड्या पार्किंगची जागा देण्यासाठी मदतही केली आहे.

पुण्यात नाटकाचे भाडे पाच हजार, मग मुंबईत २५ हजार रुपये कसे?लोकसंख्येच्या परिमाणानुसार नाट्यगृहे असायला हवीत. यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून त्यांचा सल्ला घ्यायला हवा. पु. ल. देशपांडे सभागृहात लग्न-साखरपुडे होणे योग्य आहे का? शाळांसाठी राखीव भूखंड प्रायोगिक तत्त्वावरही कोणाला देऊ नयेत. पुणे बालगंधर्वमध्ये नाटकाचे भाडे ५ हजार रुपये असून, मुंबईत २५ हजार रुपये आहे. असे का?

...तर महामुंबईतही अनुभवता येईल वेगळे सांस्कृतिक वातावरणगेल्या काही वर्षांत मुंबईत सार्वजनिक उद्यानांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, मोकळ्या जागा नाहीत, त्या जागा जर पुन्हा विकसित केल्या तर अशा ठिकाणीही सांस्कृतिक कट्टा, फिरते वाचनालय या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम होऊ शकेल. हे झाले तर मुंबईत वेगळे सांस्कृतिक वातावरण आपण अनुभवू शकू.

नाट्यगृहांच्या बांधकामासाठी खास नियमावली आखायला हवी -नाट्यगृहांची इमारत बांधायची झाल्यास, आसनसंख्येनुसार आकारमान असावे, याबाबत शासनाने एक नियमावली आखायला हवी जेणेकरून वाट्टेल तशा, नाट्यक्षेत्राशी असंबंधित अशा इमारती बांधल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी म्हटले की प्रत्येक ठिकाणी बदल गरजेचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai artists' manifesto for development ahead of municipal elections.

Web Summary : Mumbai artists propose improvements for the city ahead of elections, including better facilities at theaters, preserving open spaces, population control, arts education in schools, and streamlined processes for arts organizations.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६मुंबई