मुंबईकरांकडून वर्षाला ५०० कोटींचे आंबे फस्त! वाशी मार्केटमध्ये दररोज १८०० टन आवक, काय आहेत दर?
By नामदेव मोरे | Updated: April 14, 2025 13:26 IST2025-04-14T13:24:08+5:302025-04-14T13:26:26+5:30
फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. वाशी येथील मुंबई बाजार समिती (एपीएमसी) मध्ये रोज १,५०० ते १,८०० टन आंब्याची आवक होत आहे.

मुंबईकरांकडून वर्षाला ५०० कोटींचे आंबे फस्त! वाशी मार्केटमध्ये दररोज १८०० टन आवक, काय आहेत दर?
फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. वाशी येथील मुंबई बाजार समिती (एपीएमसी) मध्ये रोज १,५०० ते १,८०० टन आंब्याची आवक होत आहे. याशिवाय थेट शेतकरी ते ग्राहक योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत आहे. सर्व माध्यमांतून यावर्षीही ५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून जुलैअखेरपर्यंत ग्रहाकांना विविध प्रकारच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे.
मुंबई ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गतवर्षी संपूर्ण जगात ४१६ कोटी रुपयांचा आंबा विकला होता. संपूर्ण जगभर जेवढी निर्यात होते, त्यापेक्षा जास्त विक्री फक्त मुंबईमध्ये होते. यंदा आंबा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी १ एप्रिलपासून आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून दररोज ६५ ते ७० हजार पेट्यांची आवक होत आहे. संपूर्ण देशातून सरासरी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक सुरू झाली आहे.
१ लाख टन अंदाजे आंब्यांची विक्री यंदाच्या संपूर्ण हंगामात होण्याची शक्यता आहे. त्यातही अक्षय तृतीयेपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मुंबई एपीएमसी ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशभरातून येथे आंबे विक्रीस येतात. फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होतील.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
आंब्याचे दर (रुपयांत)
१. हापूस (डझन)- २०० ते ७०० (होलसेल)- ५०० ते १५०० (किरकोळ)
२. पायरी (डझन)- २०० ते ६०० (होलसेल)- ४०० ते १००० (किरकोळ)
३. बदामी (किलो)- ४० ते १०० (होलसेल)- ८० ते १५० (किरकोळ)
४. लालबाग- ५० ते ७० (होलसेल)- ८० ते १०० (किरकोळ)
५. केशर- १०० ते १६० (होलसेल)- १५० ते २०० (किरकोळ)
अक्षय तृतीयेपर्यंत मुबलक फळ
कोकणातील हापूस- अक्षय तृतीयेपर्यंत सर्वाधिक आवक, मे व जूनमध्ये आवक कमी.
गुजरात- मेच्या सुरुवातीपासून हापूस, केशर, राजापुरी, पायरी
पुणे- मे अखेरपासून जुन्नर हापूसची आवक
उत्तर प्रदेश- मे अखेरपासून जुलैअखेरपर्यंत लंगडा, दशेरी, चोसाची आवक
...या राज्यांतून आवक
सद्य:स्थितीमध्ये कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व इतर राज्यांमधूनही आंब्याची आवक होणार आहे.