Mango: फळांच्या राजाचा गोडवा होणार कमी!

By नामदेव मोरे | Updated: March 31, 2025 13:14 IST2025-03-31T13:11:53+5:302025-03-31T13:14:35+5:30

Mango Market: फळांच्या राजाने गतवर्षी सात महिने बाजारपेठेवर राज्य केले होते. परंतु, यावर्षी वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन कमी झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही आवक निम्म्यावर आली आहे.

Mango: The sweetness of the king of fruits will decrease! | Mango: फळांच्या राजाचा गोडवा होणार कमी!

Mango: फळांच्या राजाचा गोडवा होणार कमी!

- नामदेव मोरे
(उपमुख्य उपसंपादक)

फळांच्या राजाने गतवर्षी सात महिने बाजारपेठेवर राज्य केले होते. परंतु, यावर्षी वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन कमी झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही आवक निम्म्यावर आली आहे. देश-विदेशातील ग्राहकांवर फळांचा राजा रुसला आहे. यावर्षी संपूर्ण हंगामात आंब्याचे दर तेजीत राहणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

गतवर्षी देशातून जवळपास ४९५ कोटी रुपयांचा आंबा व ६२४ कोटी रुपयांचा आमरस निर्यात झाला होता. परंतु, यावर्षी कोकणसह देशभर ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका व्यवसायावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी गुढीपाडव्याच्या दरम्यान सरासरी ९० ते ९५ हजार पेट्यांची आवक होत होती. यावर्षी ती ५० हजार पेट्यांवर आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गतवर्षी बाजार समितीत हापूस २५० ते ८०० रुपये डझन दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर ३०० ते १,२०० रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी १ एप्रिल ते १० मे दरम्यान ४० दिवस हंगाम चांगला राहील असा अंदाज आहे. प्रत्येक वर्षी मेमध्ये हापूससह सर्वच आंबे सामान्यांच्या आवाक्यात येतात. पण यंदा मेमध्येही जादा दराने आंबे विकत घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

उत्पादन कशामुळे घटले?
यावर्षी हिवाळ्याचा कालावधी लांबला व उष्मा लवकर सुरू झाला. यामुळे आंब्याला मोहर उशिरा आला व अपेक्षित फळधारणा झाली नाही. तीव्र उकाड्याचा परिणामही उत्पादनावर झाला आहे. हवामानातील या बदलाचा कोकणसह देशभरातील आंबा उत्पादनावर झाला आहे. 

एप्रिलमध्ये आवक चांगली
प्रत्येक वर्षी मे महिन्यात आवक वाढून आंब्याचे दर नियंत्रणात येतात. यामुळे सामान्य ग्राहक मे महिन्यात दर कमी होण्याची वाट पाहतात. परंतु, यावर्षी मे महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये आवक चांगली होणार असल्यामुळे खरेदीसाठी मेऐवजी एप्रिल योग्य ठरेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

देशात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक उत्पादन
जगात महाराष्ट्रातील हापूस आंबा प्रसिद्ध असला तरी एकूण आंबा उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. देशातील एकूण उत्पादनापैकी २२ ते २५ टक्के उत्पादन तेथे होते. यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा व महाराष्ट्रात आंबा उत्पादन होत असते. 

Web Title: Mango: The sweetness of the king of fruits will decrease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा