आंबा पिकावर अवकळा!
By Admin | Updated: March 4, 2015 01:57 IST2015-03-04T01:57:47+5:302015-03-04T01:57:47+5:30
दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आंबा पिकाचे सुमारे ७२.६३ टक्के, तर काजूचे ६१.२० टक्के नुकसान झाले आहे.

आंबा पिकावर अवकळा!
रत्नागिरी : दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आंबा पिकाचे सुमारे ७२.६३ टक्के, तर काजूचे ६१.२० टक्के नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर कुजण्याबरोबर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फळांना वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागणार आहेत. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रातील आंब्याचे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुलोरा धुवून निघाला आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने फळे कुजण्याबरोबर गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. फळाला काळे डाग पडण्याची भीती आहे.
जिल्ह्यात ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. त्यातील ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. काजूचा फुलोरा गळून पडला आहे. शिवाय काजू बीमध्ये पाणी गेल्याने बी टपोरी होणार आहे. बी वाळविली तरी गराचा आकार, रंग व चवीवरही परिणाम होणार आहे.
पांढऱ्या रंगाऐवजी गर पिवळट पडण्याचा धोका आहे. या प्रकारामुळे कोकणातील आंबा बागायतदर हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)
च्पिकांचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले असले तरी, जमीनदोस्त झालेल्या पिकांचे दृष्य स्वरूपातील नुकसानीचा अंदाज बांधणे यंत्रणेला शक्य आहे, मात्र अवकाळी पावसामुळे विलंबाने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधणे अशक्य असल्याने पंचनामे सदोष होण्याची भीती खुद्द यंत्रणेनेच व्यक्त केली आहे. साधारणत: आठ ते दहा दिवसांनी द्राक्ष मण्यांना तडे पडण्याची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येतो. तशीच स्थिती गहू, हरबरा व इतर पिकांची असते.
मंत्र्यांच्या दौऱ्यात अधिकारी गायब
नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिथिनवरचा आयात कर रद्द करण्याचा विचार करण्यात येईल, असे शिंदे यांनी केली.