संपत्तीवाढीसाठी मांडुळाची तस्करी

By Admin | Updated: April 28, 2017 01:03 IST2017-04-28T01:03:34+5:302017-04-28T01:03:34+5:30

गुप्तधन शोधून काढणे, आर्थिक वृद्धीसाठी, काळ्या जादूसाठी उपयोगी असल्याच्या अंधश्रद्धेतून मुंबईतील व्यापारी चक्क २५ ते ३० लाखांत

Mandu's smuggling for wealth increases | संपत्तीवाढीसाठी मांडुळाची तस्करी

संपत्तीवाढीसाठी मांडुळाची तस्करी

मुंबई : गुप्तधन शोधून काढणे, आर्थिक वृद्धीसाठी, काळ्या जादूसाठी उपयोगी असल्याच्या अंधश्रद्धेतून मुंबईतील व्यापारी चक्क २५ ते ३० लाखांत मांडुळाची खरेदी करत असल्याचे मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईतून उघड झाले. नाशिकहून मुंबईत आणलेल्या साडेचार फुटी मांडुळासह पोलिसांनी एका इस्टेट एजंट तस्कर नावीद शेख (३६) याला अटक केली.
पोलिसांनी जप्त केलेले मांडूळ तब्बल साडेचार फूट लांब असून, त्याचे वजन तीन किलो आहे. पूर्ण वाढ झालेले आणि तस्करीदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत पकडलेले सर्वांत मोठे हे पहिलेच मांडूळ आहे. त्याची बाजारातील किंमत ३० लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मांडुळाचा ५० लाखांत सौदा होणार होता. भायखळ्यातील लवलेन परिसरात एक तस्कर मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने, सुनील माने, चंद्रकांत दळवी यांच्या पथकाने सापळा रचून शेख याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. शेख हा एक रिअल इस्टेट एजंट आहे. त्या कामात तोटा आल्याने त्याने या मांडूळ तस्करीत उडी घेतली. अशात मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये संपर्कात असलेल्या नोकरदार, व्यापारी, व्यावसायिकांना तो मांडुळाचे महत्त्व पटवून देई. सावज जाळ्यात अडकताच त्याच्याकडील श्रीमंती आणि अंधश्रद्धेवरून भाव ठरवत होता. त्यामुळे तो २५ हजार रुपयांपासून सुरू असलेला भाव पुढे कोटीच्या पुढेही जात असे.
महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनीही औषध आणि जादूटोण्यासाठी विकण्यासाठी आणलेल्या दोन दुर्मीळ मांडुर्ळंसह संदीप रवींद्र पंडित व त्याचा साथीदार अनंता विठ्ठल घोडविंदे यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून ३९ इंच आणि ४४ इंच लांबीचे दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले. या कारवायांमुळे अंधश्रद्धेपोटी वन्यजीव तस्करीचा बाजार तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. पैशांचा पाऊस पडणे, गुप्तधन सापडणे, व्यवसायात भरभराट होणे अशा अंधश्रद्धेपोटी मांडुळाला लाखो रुपये मोजून घरात ठेवले जात आहे. परभणी, धुळे, अकोला या भागांमध्ये हे मांडूळ आढळून येतात. नाशिकमधूनही जप्त केलेल्या या मांडुळामुळे याचे जाळे सर्वत्र पसरल्याचे दिसून येत आहे. मुंबईतले व्यापारी, व्यावसायिकांमध्ये सध्या याची मागणी वाढली आहे. मांडूळ जेवढे मोठे तेवढी त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे अनेकदा तांत्रिक - मांत्रिक या मोठ्या मांडुळांच्या शोधात असतात. अटक करण्यात आलेल्या शेखने यापूर्वीही अशा अनेक मांडुळांची तस्करी केल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mandu's smuggling for wealth increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.