Join us

अग्निशमन अधिकारी बनला पत्रकार; वाचविला अयोध्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 16:54 IST

अग्निशमन दलाच्या हुशार अधिकाऱ्याने पत्रकार बनून आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचविले आहे

मुंबई - वरळी दूरदर्शन केंद्राच्या टॉवरवर शुक्रवारी (6 जुलै) पहाटे अग्निशमन दलाच्या हुशार अधिकाऱ्याने पत्रकार बनून आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचविले आहे. देवेंद्र शिवाजी पाटील असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. नोकरीवरून कमी केल्याने अयोध्या पासवान (वय - 30) आत्महत्या करण्यासाठी दूरदर्शनच्या टॉवरवर चढला होता. मध्यरात्री 2.30 वाजता त्याने टॉवरवरून चढून आत्महत्येचे नाट्य सुरु केले ते शुक्रवारी सकाळी 7 वाजता संपले. पासवान हा विठ्ठलवाडी येथे राहणारा असून त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे.   

आत्महत्या करण्यासाठी टॉवर चढलेला पासवानने पोलीस नियंत्रण कक्षास कॉल केला. मात्र, मध्यरात्री काळोख आणि पाऊस असल्याने टॉवर चढण्यास थोडा उशीर होत होता असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पासवानने केवळ  मीडियाशीच आपलं गाऱ्हाणं सांगणार असल्याचा हट्ट केला होता. नाहीतर उडी मारणार असे पासवानने पोलिसांना सांगितले. नंतर शेवटी अग्निशमन दलाच्या पाटील या अधिकाऱ्याने अऩोखी शक्कल लढवली.  

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने पत्रकार असल्याचं खोटं सांगून तरुणाशी संवाद साधण्याचं ठरवलं. त्यानुसार डमी कॅमेरा सेटअपही लावण्यात आला. पाटील या अधिकाऱ्यांने  पत्रकार असल्याचे सांगत तरुणाशी फोन करून संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याने तो एक ड्रायव्हर असून त्याला सध्या एका नोकरीवरुन काढून टाकल्याचं सांगितलं. त्यामुळेच केवळ त्याच्या केवळ दोनच मागण्या आहेत . त्याम्हणजे सर्व चालकांना चांगला पगार आणि बोनस असावा असं सांगितलं. 

जवळपास चार तासाच्या संभाषणानंतर हा तरुण शनिवारी सकाळी सात वाजता टॉवरवरून खाली उतरण्यास तयार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित परिसरात घुसल्यामुळे तरुणाला 5 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. पासवान दारूच्या नशेमध्ये होता . तसेच पोलिसांना उडी मारण्याची धमकी देत होता. मात्र काही तासाच्या प्रयत्नांनंतर तो खाली उतरण्यास तयार झाला. मात्र कोणतेही अधिकार नसताना तरुणाने या परिसरात कशी एन्ट्री केली हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं.  

टॅग्स :मुंबईआत्महत्या