खासगीकरणातून कुपोषणमुक्ती
By Admin | Updated: August 11, 2014 23:26 IST2014-08-11T23:26:42+5:302014-08-11T23:26:42+5:30
ठाणे-पालघर हे दोन्ही जिल्हे भविष्यात कुपोषणमुक्त करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ‘जेएसडब्ल्यू’ या खासगी कंपनीशी पाच वर्षे मुदतीचा करार केला आहे

खासगीकरणातून कुपोषणमुक्ती
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे-पालघर हे दोन्ही जिल्हे भविष्यात कुपोषणमुक्त करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ‘जेएसडब्ल्यू’ या खासगी कंपनीशी पाच वर्षे मुदतीचा करार केला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच करार असून या सामंजस्य कराराद्वारे स्मार्ट मोबाइल फोनच्या माध्यमातून संबंधित बालकांच्या छायाचित्रासह संपूर्ण माहिती अंगणवाडी सेविकेद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांना तत्काळ प्राप्त करून दिली जाणार आहे. यानंतर पुढील उपचारासाठी तत्काळ मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे. यासाठी कंपनीकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.
या अंगणवाडीतील प्रत्येक मुला-मुलींच्या लेटेस्ट छायाचित्रासह माहितीपूर्ण डाटा संगणकावर तयार होऊन बालकाच्या सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शनही तत्काळ देणे यामुळे शक्य होणार आहे़ बालकांचे उंची, वजन घेण्यासाठी तीन अंगणवाड्यांसाठी एक ‘इन्फोटोमीटर’ हे उपकरण देण्यात आले आहे. यासह मिळणारी परिपूर्ण माहिती लॅपटॉपवर फिडअप करून आॅनलाइनच्या माध्यमातून संबंधित अधिकारी, डॉक्टर, प्रकल्प संचालक यांना सहज उपलब्ध होणार आहे. यापाठोपाठ मोखाडा तालुक्याच्या प्रकल्पामधील अंगणवाड्यांच्या सुमारे दहा हजार बालकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
कोणत्याही खासगी कंपनीला तिच्या उत्पन्नातील २ टक्के खर्च ‘कॉर्पोरेट सोसिएल रिस्पाँसिबीलिटी’ खाली करावा लागत असल्यामुळे या खासगी कंपनीशी हा सामंजस्य करार करून ठाणे-पालघर हे जिल्हे कुपोषणमुक्त करण्याचा उपक्रम देशात प्रथम राबविला जात आहे. जव्हार व मोखाडा येथील अंगणवाडी केंद्रामध्ये हा उपक्रम प्रथम राबविला जात आहे. यासाठी सध्या सुमारे आठ सुपरवायझर बालकांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचा डाटा तयार करीत आहेत. यासाठी त्यांना लॅपटॉप व मोबाइलचा पुरवठा करण्यात आला असून ही संपूर्ण माहिती संकलनाचे काम जव्हार येथे सुरू आहे. या उपक्रमाचा आढावा जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरील हा उपक्रम २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
कुपोषणमुक्त करणाऱ्या या उपक्रमाच्या दरम्यान स्तनदा व गरोदर माता, किशोरवयीन मुली यांचे आरोग्य व पोषण आहारावरदेखील लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याशिवाय अंगणवाडी केंद्रातील मुला-मुलींचे माता-पिता, गावकरी, समाजसेवक यांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य घेतले जाणार आहेत.
याशिवाय कमी पाण्यात म्हणजे आंघोळीच्या सांडपाण्यात घेता येईल आशा पोषक भाजीपाल्याचे उत्पादनासाठी कृषी विभागाद्वारे व्हेजिटेबल किटचे वाटप करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराची माहिती घेण्यासाठी कृषी क्षेत्रात पारंगत असलेल्या हैदराबाद येथील ‘इक्वीसॅट’ ही संस्था दोन तज्ज्ञांकडून अहवालदेखील तयार करत आहे.