मॉल ठरू शकतात ‘सॉफ्ट टार्गेट’
By Admin | Updated: August 12, 2015 04:50 IST2015-08-12T04:50:10+5:302015-08-12T04:50:10+5:30
दहशतवादी हल्ला, महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवा, सतर्क राहा अशा सूचना वेळोवेळी पोलिसांनी देऊनही मॉल व्यवस्थापन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे लोकमतने

मॉल ठरू शकतात ‘सॉफ्ट टार्गेट’
टीम लोकमत, मुंबई
दहशतवादी हल्ला, महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवा, सतर्क राहा अशा सूचना वेळोवेळी पोलिसांनी देऊनही मॉल व्यवस्थापन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले.
‘टीम लोकमत’चे १४ प्रतिनिधी एकाच वेळी शहर-उपनगरांतील ११ मॉलमध्ये गटागटाने धारदार चाकू, सुरे, टॉय गन, करवत, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी-स्टीलचे डबे अशी घातक हत्यारे व संशयास्पद वस्तू घेऊन शिरले. टीमचे काही सदस्य मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले, तर काहींनी बेसमेन्टमधील पार्किंग लॉटमधून मॉलमध्ये सहज प्रवेश मिळवला.
मॉलच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर महिला-पुरुष सुरक्षारक्षक होते. काही ठिकाणीस्कॅनर मशिन्स होत्या. उर्वरित ठिकाणी हॅण्ड व डोअर मेटल डिटेक्टर होते. याशिवाय आत येणाऱ्या प्रत्येकाची बॅग, सॅक, पिशव्यांची तपासणी करण्यासाठी, अंगझडतीसाठी अधिकचे मनुष्यबळही होते. एवढा चोख बंदोबस्त असूनही ‘टीम लोकमत’च्या प्रतिनिधींनी अगदी सहजरीत्या हत्यारे, अवजारे व संशयास्पद वस्तू मॉलमध्ये नेल्या. काही ठिकाणी फक्त अंगझडती घेतली गेली. यावेळी सोबत नेलेल्या सामानाची तपासणी झालीच नाही. बहुतांश ठिकाणी हॅण्ड मेटल डिटेक्टर असूनही सुरक्षारक्षक त्याचा वापर टाळताना दिसले. काही ठिकाणी सॅक, बॅग, पिशव्यांची वरवर पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे स्कॅनर मशिन्समध्ये चाचपणी होऊनही सॅक, बॅग, पिशव्यांमध्ये सुरी कशी काय, स्क्रूड्रायव्हर का सोबत आणला, डब्यात जेवणच आहे ना, असा एकही कुतूहलात्मक प्रश्न सुरक्षारक्षकांकडून विचारण्यात आला नाही. मॉलमध्ये आलेल्या कारची झाडाझडती मोजक्याच ठिकाणी घेतली जात होती. अनेक ठिकाणी आवारात आलेल्या कार विनातपासणी थेट पार्किंग लॉटमध्ये शिरताना आढळल्या.