Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिक कि दुवा से बच गया, वरळीत बालंबाल वाचलेल्याची ‘आँखो देखी’

By मनीषा म्हात्रे | Updated: February 16, 2023 09:52 IST

वरळी दुर्घटनेत बालंबाल वाचलेल्याची ‘आँखो देखी’

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फोर सीझन रेसिडेन्सी इमारतीवरील क्रेन फिरल्याने तेथील मोठे दगड कोसळून चहा टपरीवर चहा घेत असलेले दोघे जागीच ठार झाले. याच दरम्यान दुकानदार थोडक्यात बचावला. मृत्यू पुढ्यात होता मात्र देवाच्या कृपेने वाचल्याचे दुकानदार गौरीशंकर जैसवार यांनी सांगितले. 

या अपघातात  शाबीर अली शाकिर अली मिर्झा (३७) आणि इम्रान अली खान  (२९) या दोघांचा मृत्यू झाला आहे. वरळी येथील शेवी एक्सपोर्ट येथे ते नक्षीकाम करणाऱ्या कंपनीत कामाला होते. इम्रान हा सुपरवायझर, तर शाबीर कारागीर होता. दोघेही सेकंड शिफ्टला होते. रात्री उशिराने जेवणाची सवय असल्याने रात्री साडेआठ वाजता जेवणासाठीच्या ब्रेकदरम्यान ते चहासाठी गौरीशंकर यांच्या टपरीवर आले होते. गौरीशंकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शाबीर, इम्रानसह आणखीन चारजण नेहमी यावेळेत चहासाठी येतात. मात्र, मंगळवारी दोघेच आले. मुलगा दुकानात होता, तर मी बाजूला अंडी विक्री करत होतो. दोघे  माझ्या शेजारी थांबून चहा घेत गप्पा मारत असताना अचानक जोराचा आवाज झाला. क्षणभर काय झाले कळले नाही. कामगारांची किंकाळी आणि धुरळाने परिसरात गोंधळ उडाला. मी मुलाला दुकानातून बाहेर काढून पळालो. समोर पाहिले तर दोघे मृतावस्थेत पडले होते. यामध्ये, ‘मालिक कि दुवासे मे बच गया’, असे त्याने सांगितले. 

..तो कॉल अखेरचा ठरला इम्रान हा कोलकाताचा रहिवासी असून, पत्नी आणि साडेपाच वर्षाचा मुलगा आहे. दोघेही गावी असतात. त्याचा चुलत भाऊ आशाद खानने दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. बुधवारी वडिलांना तपासणीसाठी न्यायचे असल्याचे याबाबत पत्नीला फोन करून चौकशी करत असताना डोक्यावर दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. 

परवाच भेट आणि आज मृतदेह समोर     मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या शाबीरला पत्नी आणि दोन मुले आहे. तेदेखील गावीच असतात. त्याची मुंब्रा येथे राहणारी बहीण निगार फातिमा यांनी  सांगितले, परवाच भाऊ घरी आला.     घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने एक रात्र घरी होता. आणि दुसऱ्या दिवशी कामावर जायचे असल्याने परतला. ती भेट अखेरची ठरेल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते हे सांगताना तिने हंबरडा फोडला. 

टॅग्स :मुंबईअपघात