Join us  

डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाच्या पायात २ इंचाची काच; मनसेनं उघडकीस आणला शताब्दी रुग्णालयाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 8:04 PM

शताब्दी रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांना मनसेचा इशारा

मुंबई - महापालिकेच्या अखत्यारितील शताब्दी रूग्णालयावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धडक दिली. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना असंवेदनशील वागणूक दिल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रदीप आंग्रे यांच्याकडे केली. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई न केल्यास रूग्णालय प्रशासनाला जनआंदोलनाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी यावेळी दिला. 

एक जुलैच्या मध्यरात्री मालाड येथील भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर १००हून अधिक जखमी झाले. यातील बहुसंख्य जखमींवर शताब्दी रूग्णालयात उपचार करण्यात आले. हे उपचार करताना रूग्णालयातील डॉक्टरांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांसोबत असंवेदनशील व्यवहार केल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. त्यांपैकी सोनू कनोजिया यांना आलेला रूग्णालयाचा अनुभव शालिनी ठाकरे यांनी सर्वांसमोर मांडला. 

दुर्घटनेत जखमी झालेल्या सोनू कनोजिया यांना रुग्णालयात १५ दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. पण कनोजिया यांचं घर वाहून गेलं होते. त्यामुळे मनसेचे उपशाखाध्यक्ष झाकीर शेख त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. मात्र दोनच दिवसांत सोनू यांना होणाऱ्या असह्य वेदना पाहून शेख यांनी कनोजियांना जवळच्याच एका खासगी रूग्णालयात दाखल केले. त्या खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी सोनू कनोजिया यांच्या पायातून दोन इंच लांबीची काच बाहेर काढली. 

सोनू कनोजिया यांची व्यथा मांडत ही बाब धक्कादायक असून महापालिकेच्या रूग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचं शालिनी ठाकरे म्हणाल्या. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज देण्यासाठी रूग्णालयाकडून घाई केली जात होती. त्यामुळे अनेक जखमींवर पुरेसे उपचार झालेलेच नाहीत, असं शालिनी ठाकरेंनी म्हटलं. 

सोनू कनोजिया यांच्यावर रूग्णालयात नेमके कोणते उपचार केले गेले? त्यांच्या पायातील काच महापालिकेच्या रूग्णालयातील डॉक्टरांना का दिसली नाही? सोनू कनोजिया यांच्याप्रमाणे इतरही काही रूग्णांवर अपुरे किंवा अयोग्य वैद्यकीय उपचार केले गेले का? ज्या जखमींचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, त्यांच्यातील काही जणांच्या मृत्यूला डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा तर कारणीभूत नाही ना? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मनसेच्या शिष्टमंडळाने अधिष्ठात्यांवर केली.

"भविष्यात रूग्णांवरील वैद्यकीय उपचारांबाबत पुरेशी काळजी घेतली जावी, यासाठी आपण तत्काळ नव्याने नियमावली तयार करुन तिची अंमलबजावणी करावी. तसंच सोनू कनोजिया यांच्यावरील उपचारांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही आमची तुमच्याकडे अत्यंत आग्रहाची मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शताब्दी रूग्णालयाविरोधात आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे राहणार नाही", अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी रूग्णालय प्रशासनाला इशारा दिला.

मनसेच्या शिष्टमंडळात पक्षाचे उपाध्यक्ष अवधूत चव्हाण, दिंडोशी विधानसभा अध्यक्ष अरूण सुर्वे, उपविभागअध्यक्ष केतन नाईक यांचा समावेश होतो. याप्रसंगी मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रूग्णालयाबाहेर घोषणा देऊन प्रशासनाचा जाहीर निषेध केला. 

रुग्णालयावर अतिरिक्त ताणमनसे शिष्टमंडळाला उत्तर देताना अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे म्हणाले, "पश्चिम उपनगरात कूपर रुग्णालय आणि बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सोडता पालिका रुग्णालय नाही. त्यामुळे शताब्दी रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे."

महापालिकेचा असंवेदनशील कारभारमुंबई महापालिकेची पश्चिम उपनगरातील भगवती रुग्णालय, सिद्धांत रुग्णालय बंद पडली आहेत. पालिकेने बांधलेल्या भिंती लोकांवर कोसळतात, पण जखमींवर वैद्यकीय उपचार करण्याच्या पुरेशा सुविधासुद्धा मुंबई महापालिकेचे सत्ताधारी निर्माण करू शकलेले नाहीत. पश्चिम उपनगरातील लोकसंख्येचा विचार करता नव्या रुग्णालयाची तसंच जुनी रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचं मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. 

टॅग्स :मालाड दुर्घटनामनसे