माळद डोंगराला तडा
By Admin | Updated: August 18, 2014 01:01 IST2014-08-18T01:01:38+5:302014-08-18T01:01:38+5:30
मागील आठवड्यात बरोबर शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू असताना शहापूर तालुक्यातील डोळखांबशेजारील जांभूळवाड येथील डोंगराला तडे गेले होते.

माळद डोंगराला तडा
टिटवाळा : गेल्याच आठवड्यात डोळखांबशेजारील जांभूळवाडच्या डोंगराला भेगा पडल्याची घटना ताजी असताना त्याच परिसरातील भिनार माळदच्या गुरचरण राखीव डोंगराला तडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात बरोबर शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू असताना शहापूर तालुक्यातील डोळखांबशेजारील जांभूळवाड येथील डोंगराला तडे गेले होते. ही घटना ताजी असतानाच बरोबर आज आठवडाभरात त्याच परिसरातील माळद-भिनार गावाशेजारील गुरचरणासाठी राखीव असलेल्या डोंगराला ५ फूट खोलीच्या भेगा पडल्या असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती देताच किन्हवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी व महसूल विभाग, वन खात्याच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. जांभूळवाडच्या डोंगराला भेगा पडल्यानंतर काही दिवसांनी पाहणी केल्यानंतर तेथून पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, या ठिकाणी भूगर्भशास्त्राचे अभ्यासक, जिओलॉजिकल सर्व्हेचे पथक येऊन पाहणी करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रियेसाठी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
माळीणच्या दुर्घटनेनंतर असे भूस्खलनाचे प्रकार डोळखांब परिसरात वारंवार घडू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. (वार्ताहर)