याकूबच्या पत्नीला खासदार बनवा - सपा नेत्याची संतापजनक मागणी
By Admin | Updated: August 1, 2015 12:51 IST2015-08-01T10:01:00+5:302015-08-01T12:51:48+5:30
देशातील अनेक नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या याकूब मेमनच्या पत्नीलाच खासदार बनवावे अशी संतापजनक मागणी सपाच्या नेत्याने केली आहे.

याकूबच्या पत्नीला खासदार बनवा - सपा नेत्याची संतापजनक मागणी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यावरही अजून त्याच्या फाशीचे राजकारण करण्यात येत आहे. देशाचा गुन्हेगार ठरलेल्या याकूबच्या पत्नीला चक्क खासदार बनवण्याची संतापजनक मागणी समाजवादी पक्षाच्या नेत्याने केली आहे. सपाचे राज्यातील प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद फारूख घोसी यांनी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना पत्र लिहून याकूबची पत्नी राहीन मेमन हिला खासदार बनवण्यात यावे अशी धक्कादायक मागणी केली आहे. यामुले आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
' मुंबई बाँबस्फोटांप्रकरणी याकूबसह त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. न्यायालयाने याकूबला दोषी ठरवले तर राहीनची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण त्यापूर्वी तिने अनेक वर्ष तुरूंगातच काढली, कित्येक यातना सहन केल्या. ती सध्या असहाय्य अवस्थेत आहे, त्यामुळे तिला मदत करण्यासाठी समाजवादी पक्षाने तिला खासदार करावे' असे मोहम्मद यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
३० जुलै रोजी याकूबला नागपूर मध्यवपर्ती कारागृहात फाशी देण्यात आली व त्यानंतर मुंबईत त्याचा दफनविधी झाला. एकीकडे याकूबच्या फाशीच्या उदात्तीकरणावरून टीका होत असतानाच समाजजवादी पक्षाने एका गुन्हेगाराच्या पत्नीला देशातील खासदार बनवण्याची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.