दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:02+5:302021-02-05T04:33:02+5:30
मुंबई - आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या महापालिकेने काटकसरीचे धोरण आखले असले तरी दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरीचा मार्ग मात्र ...

दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरीचा मार्ग मोकळा
मुंबई - आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या महापालिकेने काटकसरीचे धोरण आखले असले तरी दादर चौपाटीवरील दर्शक गॅलरीचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या गॅलरीसाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे आठ महिन्यांनंतर पर्यटकांना या गॅलरीत उभे राहून समुद्राच्या भरती-ओहोटी, वरळीपासून थेट वांद्र्यापर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहेत. ही गॅलरी उंचावर बांधण्यात येणार असल्याने पावसातही पर्यटकांना लाटांचा आनंद घेता येणार आहे.
दादर परिसरात पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. गिरण्या बंद असल्यामुळे हा आऊटफॉल वापरात नाही. हा आऊटफॉल तुटलेल्या अवस्थेत असला तरी दादर चौपाटीवर येणारे लोक येथे बसतात. त्यामुळे दादर चौपाटीवर चैत्यभूमीच्या मागील बाजूस समुद्रकिनाऱ्यावर गॅलरी उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
या गॅलरीसाठी आराखडा तयार करण्याचे काम गेल्या वर्षी महापालिकेने सुरू केले. मात्र लॉकडाऊनच्या काळात हे काम लांबणीवर पडले होते. यासाठी आवश्यक परवानगी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकतीच महापालिकेला दिली. या प्रकल्पासाठी तीन कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र सर्व करांसहित पालिकेला चार कोटी ५९ कोटींचा खर्च येणार आहे. गॅलरीमध्ये उतारही ठेवण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनाही येथे येता येणार आहे.