कोल्हापूर १०० दिवसांत टोलमुक्त करू
By Admin | Updated: September 17, 2014 00:24 IST2014-09-17T00:22:13+5:302014-09-17T00:24:07+5:30
अजित पवार यांची घोषणा : राष्ट्रवादीला पुन्हा संधी द्या; जनतेचे भले कशात आहे, हे पाहूनच आम्ही निर्णय घेतले

कोल्हापूर १०० दिवसांत टोलमुक्त करू
कोल्हापूर : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास कोल्हापूरचा टोल शंभर दिवसांत रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, मंगळवारी येथे झालेल्या पक्षाच्या जाहीर प्रचारसभेत केली. महापालिकेत आम्हाला सत्ता दिल्यावर कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा निर्णय आम्ही घेतला. तसाच निर्णय राज्यात पुन्हा सत्ता आल्यावर घेऊ, असे पवार यांनी जाहीर केले.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात पुन्हा टोलचे आंदोलन सुरु झाले आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार असताना गेली तीन वर्षे या प्रश्र्नावरून ठोस निर्णय झाला नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न झाला. काल झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुन्हा सत्ता आल्यास टोलचा प्रश्र्न सोडविण्यात आनंदच वाटेल असे वक्तव्य केले होते. परंतु या प्रश्र्नाबद्दल जनमाणसांत नाराजी आहे, याचे भान आल्याने पवार काका-पुतण्यांनी टोलच्या प्रश्र्नावर कोल्हापूरच्या जनतेला पुन्हा चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.जनतेचे भले कशात आहे असेच निर्णय राष्ट्रवादीने सत्तेत असताना घेतले असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, ‘बारामतीचा टोल रद्द झाला असे म्हटले जाते, परंतु तिथे आजही टोल सुरु आहे. सिडकोने एक हजार कोटी व एमएमआरडीएने २०० कोटी असे १२०० कोटी देऊन खारघरचा टोल रद्द करावा, असा आग्रह माझाही होता परंतु तो निर्णय झाला नाही. राज्य सरकारने साडेतीनशे कोटी रुपये तरतूद करून काही टोलनाके रद्द केले. तसाच तोडगा बारामतीबाबत काढण्याचा विचार सुरु आहे. राज्यात आमचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास कोल्हापूरचा टोलही शंभर दिवसांत रद्द करू. सभेसाठी व्यासपीठावर जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मानसिंगराव गायकवाड, भैयासाहेब कुपेकर, बाळ कुपेकर, संग्राम कुपेकर, महापौर तृप्ती माळवी, व्ही. बी. पाटील, अशोकराव साळोखे, चंद्रकांत बोंद्रे, नंदिनी बाभूळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सभा यशस्वी होण्यासाठी आर. के. पोवार, भैया माने, राजू लाटकर, अनिल साळोखे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, महेश सावंत, मिलिंद धोंड, आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन ताज मुल्लाणी यांनी केले. (प्रतिनिधी)
विनोद तावडेंची बडबड
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचा आज पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. हा पट्ट्या कधी जनतेतून निवडून आला नाही. जनतेच्या प्रश्नांची नीट माहिती नाही, असे असताना हा पट्ट्या काहीही बरळत सुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी तावडे यांना टोला हाणला.
शेट्टी मूग गिळून गप्प का ?
लोकसभा निवडणुकीत नुसते स्वप्ने दाखवून सत्तांतर झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असताना ‘स्वाभिमाना’ची भाषा करणारे आता मूग गिळून गप्प का आहेत? अशी विचारणा पवार यांनी केली. ते म्हणाले,‘ कांदा, डाळिंब्याचे वाटोळे लागले. दूध उत्पादकही अडचणीत आहे. दूध पावडरचे दर घसरले आहेत. युपीएचे सरकार असताना साखरेचे दर तीन हजार होते, आता ते २७०० रुपयांवर घसरले आहेत, परंतु त्याकडे केंद्र शासन लक्ष द्यायला
तयार नाही.’
मैदानात तुडुंब गर्दी
राष्ट्रवादी कॉँग्रेसची या जाहीरसभेसाठी कोल्हापूरसह सांगली व सातारा येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने गांधी मैदानात तुडुंब गर्दी झाली होती. होणारी गर्दी लक्षात घेता संयोजकांनी दोन स्क्रीनची व्यवस्था केली होती. चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था शिवाजी स्टेडियम येथे होती. त्यामुळे टेंबे रोड, खरी कॉर्नरवरून कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे सभास्थळी येताना दिसत होते.
संयोजकांनी दोन स्क्रीनची व्यवस्था केली
राष्ट्रवादी कॉँग्रेसची या जाहीरसभेसाठी कोल्हापूरसह सांगली व सातारा येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने गांधी मैदानात तुडुंब गर्दी झाली होती. होणारी गर्दी लक्षात घेता संयोजकांनी दोन स्क्रीनची व्यवस्था केली होती. चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था शिवाजी स्टेडियम येथे होती. त्यामुळे टेंबे रोड, खरी कॉर्नरवरून कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे सभास्थळी येताना दिसत होते.
शरद पवार मुंबईला रवाना
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रचार शुभारंभाची जाहीर सभा संपल्यानंतर रात्री पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मोटारीने बेळगावला गेले. तेथून रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने मुंबईला रवाना झाले.
शहांची डाळ शिजणार नाही
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात ११ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. ते आता महाराष्ट्रात येत आहेत. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा अनेक शाह्या येऊन गेल्या आहेत. त्यामुळे अमित शहांची या ठिकाणी काही एक डाळ शिजणार नाही, अशा शब्दांत खिल्ली उडविली.