Join us  

जुन्या मालिकांच्या प्रसारणामुळे सशुल्क वाहिन्या चार महिन्यांसाठी निशुल्क करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 6:15 AM

महाराष्ट्र केबल आॅपरेटर फाऊंडेशनने याबाबत इंडियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशनचे (आयबीएफ)अध्यक्ष एन पी सिंग यांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी केली आहे.

मुंबई : लॉकडाउनमुळे सध्या कोणत्याही नवीन दूरचित्रवाणी मालिकांचे निर्मिती सुरु नाही त्यामुळे विविध वाहिन्यांवर जुन्या रेकॉर्डिंग मालिकांचेच सातत्याने प्रसारण सुरु आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे केबल चालकांना केबल ग्राहकांकडून शुल्क वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सशुल्क वाहिन्यांचे शुल्क चार महिने कालावधीसाठी आकारु नये अशी मागणी केबल चालकांकडून केली जात आहे.महाराष्ट्र केबल आॅपरेटर फाऊंडेशनने याबाबत इंडियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशनचे (आयबीएफ)अध्यक्ष एन पी सिंग यांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. आयबीएफच्या सदस्यांकडून सशुल्क वाहिन्यांसाठी १० पैेसे ते १९ रुपये दर आकारला जातो. सध्या कोणत्याही वाहिन्यांवर नवीन कार्यक्रम सुरु नसल्याने ग्राहकांकडून या वाहिन्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच एमएसओ कडून या वाहिन्यांच्या शुल्कापोटी केबल चालकांना सतावले जात असल्याने केबल चालकांमध्ये नाराजी आहे. केबल ग्राहकांकडून पैसे मिळत नसल्याने या वाहिन्या दाखवण्याचे थांबवण्याचा निर्णय केबल चालक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क वाहिन्यांचे शुल्क चार महिन्यांसाठी घेऊ नये व त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा असे फाऊंडेशनने आयबीएफला सुचवल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी दिली.शुल्क वेळेवर देणे होतेय अशक्यलॉकडाउनमुळे केबल ग्राहकांकडून केबल चालकांना वेळेवर शुल्क मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे केबल चालकांना एमएसओना पैसे देणे अशक्य होत चालले आहे. मात्र त्यांच्याकडून शुल्कापोटी पैसे वेळेवर देण्यासाठी दबाव वाढत असल्याने फाऊंडेशनने ही मागणी केली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन