Join us  

अभयारण्यांचे संचारमार्ग अबाधित राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:57 AM

नॅशनल पार्कपलीकडचे तुंगारेश्वर अभयारण्य, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असणारी सर्व विविध अभयारण्ये, त्यांना जोडणारे वन्यजिवांचे संचार मार्ग अबाधित राखणे आवश्यक आहे.

मुंबई  - नॅशनल पार्कपलीकडचे तुंगारेश्वर अभयारण्य, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असणारी सर्व विविध अभयारण्ये, त्यांना जोडणारे वन्यजिवांचे संचार मार्ग अबाधित राखणे आवश्यक आहे. तथापि, सध्या प्रस्तावित असलेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे हे संचार मार्ग धोक्यात आले आहेत. प्रकल्पांची आवश्यकता, वन्यजिवांचे महत्त्व ओळखून त्यावर उपाययोजना मांडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे, असे आवाहन सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी केले.बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई प्रेस क्लब आणि सातपुडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत वनविभागावर होणारे अतिक्रमण, विकास प्रकल्प, वन्यजिवांचा मानवी वस्तीतील वाढता वावर, झाडांची कत्तल या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या कार्यशाळेत वनाधिकारी, निसर्गप्रेमी, पत्रकार, मुंबई प्रेस क्लबचे सभासद यांच्यासह सर्वसामान्यांची उपस्थिती होती.पहिल्या सत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य संचालक अन्वर अहमद यांनी राष्ट्रीय उद्यानाची माहिती दिली. कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्टचे विश्वस्त डेबी गोयंका यांनी नॅशनल पार्कलगतची अतिक्रमणे आणि त्यामुळे धोक्यात आलेल्या वन्यजिवांच्या अधिवासावर भाष्य केले. सातपुडा फाउंडेशनचे कार्यकर्ते मंदार पिंगळे यांनी वने आणि वन्यजिवांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या शिस्तबद्ध प्रयत्नांबाबत उपस्थितांना माहिती दिली.वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी कॅमेरा ट्रॅपिंगमार्फत कशा पद्धतीने बिबट्याची माहिती संकलित करणे शक्य आहे, याची चित्रफीत दाखविली. लेण्यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी कान्हेरी गुंफांबद्दल भाष्य केले. तर दुसऱ्या सत्रात निसर्ग अभ्यासक शार्दुल बाजीकर यांनी शिलोंढा येथील विविध वनस्पती, कीटकांच्या प्रजाती आणि पक्ष्यांची माहिती दिली.कांदळवनाचे अभ्यासक विवेक कुलकर्णी यांनी मुंबई शहरातील कांदळवनाचा इतिहास कथन करून कांदळवनांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी विविध विकास प्रकल्प राबवताना वने-वन्यजीव-पर्यावरण यांचे रक्षण करणेही महत्त्वपूर्ण बनल्याचे सांगितले.

टॅग्स :जंगलमहाराष्ट्र