मुख्य रस्ता होणार ट्रॅफिक फ्री
By Admin | Updated: July 6, 2014 23:54 IST2014-07-06T23:54:12+5:302014-07-06T23:54:12+5:30
पनवेल-सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्रॅफिक फ्री करण्याकरिता नवी मुंबई वाहतूक शाखेने पाऊल उचलले आहे.

मुख्य रस्ता होणार ट्रॅफिक फ्री
पनवेल : पनवेल-सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्रॅफिक फ्री करण्याकरिता नवी मुंबई वाहतूक शाखेने पाऊल उचलले आहे. या मार्गावर अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्र्किंगला लगाम घालणे तसेच वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने शिवसेना शाखा ते करवली नाका या दरम्यान सम विषम तारखेस पार्र्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले असून प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
वसाहतीमधील मुख्य बाजारपेठ, शाळा, हॉस्पीटल, वाहतूकदार यांची कार्यालये, बँका व इतर स्वयंसेवी संस्थांची कार्यालये आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक, मालाची चढउतार करणारी वाहने, हातगाडीवाले व अॉटोरिक्षा चालक हे त्यांची वाहने रस्त्यावर उभी करतात. त्याचबरोबर हा रस्ता फेरीवाले आणि हातगाड्यांनी हायजॅक केला आहे. परिणामी या मार्गावर वाहतुकीला अडथळे निर्माण होवून कोंडी होते. याशिवाय याच रस्त्यावर बस टर्मिनल असल्याने येथे दररोज एनएमएमटी आणि बेस्टच्या बस येतात. त्यांनाही अस्ताव्यस्त पार्क असलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका इच्छित स्थळी वेळेत पोहचत नाही. याबाबत अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे आल्या होत्या. त्यानुसार सदर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने सम विषम पार्किं ग करण्याच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. नागरिकांच्या हरकती आणि सूचना विचारात घेवून याबाबत अधिसूचना काढण्यात आली. या कामी सिडकोचे सहकार्य घेण्यात येणार असून त्यांच्यात माध्यमातून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सम विषम तारखांचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्रेन आणि वाहतूक पोलीस तैनात करून सम विषम पार्र्किं ग न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर यांनी सांगितले. (वार्ताहर)