Join us  

सेना-मनसे यांच्यात रंगणार मुख्य लढत, पुनर्विकास हा प्रमुख मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 4:11 AM

दगडू सकपाळ यांनी तब्बल १५ वर्षे इथे वर्चस्व गाजवत शिवसेनेला यश मिळवून दिले. २००९ मध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला मनसेने खिंडार पाडले.

- स्नेहा मोरेमुंबई : शिवडी मतदारसंघात मराठी माणसाचे प्राबल्य असल्यामुळे शिवसेना आणि मनसेमध्ये लढत असणार आहे. शिवडी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही. शिवडी भागात पुनर्विकास हा प्रमुख मुद्दा आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत राहणार आहे आणि मतदार ही समस्या सोडवण्याचे आश्वासन देईल त्याच उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे.दगडू सकपाळ यांनी तब्बल १५ वर्षे इथे वर्चस्व गाजवत शिवसेनेला यश मिळवून दिले. २००९ मध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला मनसेने खिंडार पाडले. मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी अटीतटीच्या लढतीत ६ हजार मतांनी विजयी बाजी मारली. नांदगावकरांना एकूण ६४ हजार ३७५ तर सेनेच्या दगडू सकपाळ यांना ५७,९१२ मते मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेच्या शाखा आणि विभाग स्तरावर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. १९७२ सालापासून शिवसेनेच्या पक्षांतर्गत रचनेमध्ये ते कार्यरत होते. २०१४ मध्ये पहिल्यांदाच ते विधानसभेवर निवडून गेले. मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकरांचा मराठी फॅक्टर असूनदेखील त्यांनी ४१ हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व महापालिकेच्या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यामुळे या पट्ट्यातील मतदान उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरू शकते.अजय चौधरी यांच्या जोडीला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांचे नावही शिवसेना वर्तुळात चर्चेत आहे. पक्ष संघटनेसह विविध सामाजिक कार्यातही साळवींचा सहभाग आहे. शिवाय, लालबागच्या राजामुळे युवा वर्ग कनेक्ट असणे साळवी यांची जमेची बाजू आहे. लालबाग पट्ट्यातील त्यांचा वावर, माजी आमदार राहिलेल्या दगडू सकपाळ आदी ज्येष्ठ नेत्यांची जवळीक हेही मुद्दे त्यांच्या पारड्यात वजन टाकणारे आहेत.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या नंदकुमार काटकर यांनीही यंदा उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेसला या मतदारसंघात सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. राजेश हाटले येथून इच्छुक आहेत. नारायण राणेंसोबत हाटले काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. सध्या स्वाभिमान संघटनेची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. राणेंचाच पत्ता स्पष्ट नसल्याने हाटले यांचा बॅनर कोणता, हा प्रश्न आहे. युती फिस्कटल्यास भाजपकडून माजी नगरसेवक आणि एकेकाळचे शिवसैनिक नाना आंबोले उमेदवार असू शकतात.मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी गेल्या वेळी येथून लढत दिली होती. यंदा मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही. शिवडीऐवजी भायखळा किंवा अन्य एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत नांदगावकरांची चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक चेतन पेडणेकर यांचेही नाव चर्चेत येऊ शकते. सागरी हद्द नियंत्रण कायद्यामुळे या विभागातील शेकडो इमारतींचा विकास रखडला असून असंख्य रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघात ७० टक्क्यांहून अधिक मराठी मते असून, एकूण २ लाख ७० हजार मतदार आहेत.शिवडी मतदारसंघातील मुख्य समस्या- बीपीटी जमिनीवरील इमारतींचे पुनर्वसन- वाढती स्थानिक गुन्हेगारी- म्हाडा वसाहतींची दुरुस्ती- झोपडपट्टी पुनर्विकासपक्ष उमेदवार मतेशिवसेना - अजय चौधरी ७२,४६२मनसे - बाळा नांदगावकर ३०,५५३काँग्रेस - मनोज जामसूतकर १२,७३२राष्ट्रवादी काँग्रेस - नंदकुमार काटकर ५,२६९नोटा - १,८१६

टॅग्स :मनसेशिवसेना